नांदेड : दळणवळणाच्या सुविधा दुर्गम, डोंगराळ भागापर्यंत झाल्याचा दावा सरकारकडून केला जातो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षित उतरण्यापर्यंत देशाने प्रगती केली. परंतु, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही या प्रगतीची गंगा अजूनही खेड्यापाड्यापर्यंत पोहोचली नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील सिंगारवाडी या गावातील लोकांना आजही मोबाईल नेटवर्कसाठी (Mobile Network) डोंगराकडे धाव घ्यावी लागते. कारण या गावात कोणत्याच कंपनीच्या सिमकार्डला रेंज मिळत नाही. त्यामुळे महत्वाचा फोन करायचा असल्यास गावकरी थेट डोंगराची वाट धरतात.


'लो दुनिया करलो मुठ्ठी मे' म्हणत आज अनेक मोबाईल कंपन्या बाजारात सेवा देण्यासाठी उतरल्या आहेत. शहरापासून गाव, खेडा आणि तांड्यावर देखील सहज मोबाईल फोनच्या माध्यमातून संपर्क केला जातो. त्यामुळे मोबाईल नेटवर्कमुळे जग जवळ आले. या डीजीटल जगात माणसांनी एवढी प्रगती केली आहे की, चक्क चंद्र व विविध ग्रहांवर यान सोडले जाताहेत. पण, चंद्रावरच्या गप्पा सुरु असताना आजही अशी अनेक गावे आहेत, जिथे साधे तंत्रज्ञानही पोहोचले नाही. कारण अशा अनेक गावात साधे मोबाईल नेटवर्कही उपलब्ध नाही. 


नांदेड जिल्ह्यातील अदिवासी बहुल भाग असलेल्या किनवट तालुक्यातील अनेक गावात अजूनही मोबाईलला नेटवर्कच नाही.  अतिशय डोंगराळ भागात वसलेलं सिंगारवाडी हे गाव अजूनही जगाच्या संपर्कात नाही.  या गावात कोणत्याच कंपनीचे मोबाईल टॉवर नाही. मोबाईल टॉवर नसल्याने इंटरनेटची सुविधाच नाही. मोबाईल असून नेटवर्क नसल्याने गावकऱ्यांना उंच टेकडीवर किंवा झाडावर जाऊन नेटवर्कच्या संपर्कात यावं लागत. नेटवर्क नसल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतय.


मोबाईल टॉवर उभारून देण्याची मागणी...


या भागातील गावांनी अनेक वेळा मोबाईल टॉवरची मागणी केली आहे. परंतु, अद्याप या गावाला मोबाईल टॉवर उभारून देण्यात आले नाही. सिंगारवाडी सोबतच इंजेगाव, सुंगगुडा, पिंपरफोडी या गावात देखील मोबाईल नेटवर्क नाहीय. तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातील हे गावे आहेत. मोबाईल नेटवर्क नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे शासनाने तात्काळ या गावात मोबाईल टॉवर उभारून नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील गावकऱ्यांनी केलीय.


सरकारची डिजिटल इंडिया मोहीम फसली का?


भारत सरकारने डिजिटल इंडिया मोहीम सुरू केली. याचा उद्देश म्हणजे शासकीय सेवा प्रत्येक गावागावात पोहचवावी असा आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्याची देखील घोषणा या माध्यमातून करण्यात आली. मात्र, अजूनही नांदेड जिल्ह्यातील अनेक गावात चक्क मोबाईल फोनला रेंज नसल्याचे समोर आल्याने सरकारची डिजिटल इंडिया मोहीम फसली का? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chandrayan 3 : शाब्बास पोरी नाव काढलसं! चांद्रयान मोहिमेत नांदेडच्या तनुजा पत्की यांचा सहभाग