Bail Pola 2022 : आज शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाचा सण आहे. आज बैलपोळ्याचा (Bail Pola) सण आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील बाजारपेठा सजल्या आहेत. मागील दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळं हा सण मोठ्या उत्साहत साजरा करता आला नव्हता. यंदा कोरोनाचा धोका कमी झाला आहे. मात्र, अशातच मागील महिन्यात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीनं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टीनं पिचलेल्या बळीराजाला सरकारनं तत्काळ मदत करुन पोळा गोड करावा अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी तत्काळ मदत करुन पोळा गोड करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते हवेतच विरल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
श्रावणी बैल पोळ्यासाठी ग्रामीण भागातील बाजारपेठा सजल्या आहेत. बाजारपेठेत सर्जा राजाच्या वार्षिक उत्सवासाठी बाजारपेठेत रंगीबेरंगी झुल, घुंगरे, घुंगरमाळ, वेसण, दोऱ्या, कसोट्या, रंगीबेरंगी वाध्या, मस्तकी भिंग असणारे झुल, बेगड यांनी बाजारपेठा बहरुन आल्या आहेत. दरम्यान, कोरोनामुळं शेतकऱ्यांना दोन वर्षे पोळा सण साजरा करता आला नाही. तर यावर्षी झालेल्या मुबलक पर्जन्यवृष्टीमुळं हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तर दुसरीकडं दुबार, तिबार पेरणी आणि त्यानंतर झालेल्या बेफाम अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे.
पाच दिवसात शेतकऱ्यांना मदत करण्याचे कृषीमंत्र्यांनी दिले होते आश्वासन
15 दिवसांपूर्वी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ पंचनामे करुन लगेच मदत करु असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. मात्र, अद्यापही मदत मिळाली नाही. तर आज आठ दिवसांपूर्वी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी तत्काळ पंचनामे करुन पाच दिवसात शेतकऱ्यांना मदत करु आणि शेतकऱ्यांचा पोळा गोड करु हे आश्वासन दिले होते. ते आश्वासनही हवेतच विरले आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. असे असले तरी आपल्या लाडक्या सर्जा राजाच्या सजावटीसाठी बळीराजाची साहित्य खरेदीची लगबग शहरात सुरु आहे. त्यामुळं बैल पोळ्यासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. मागील महिन्यात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
पोळ्याच्या सणावारावर महागाईचे सावट
पोळ्याच्या सणावारावर महागाईचे सावट आहे. कारण बाजारात विकल्या जाणाऱ्या बैलांचे पोळ्याचे साहित्य, ज्यात घुंगरमाळ, घंटी, दोऱ्या, झुल, कसोट्या, वेसण, वाधी या वस्तूही कमालीच्या महाग झाल्या आहेत. या दुष्काळी परिस्थितीत पोळा कसा साजरा करावा या विवंचनेत शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन, पोळा गोड करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे.
महत्त्वाच्या बातम्या: