Ajit Pawar on Suspension of Officials  : अधिवेशनाच्या काळात आतापर्यंत 10 ते 12 अधिकाऱ्यांचे निलंबन (Suspension of officials) झाले आहे. पण यातील सर्वच अधिकारी दोषी नाहीत. त्यांची माहिती मी घेतली आहे. मी लोकशाहीची आयुधे वापरुन हा प्रश्न उपस्थित करतोय. यात कुठलेही राजकारण नाही. आमदार (MLA) अधिकाऱ्यांकडून काम होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करतात. पण सर्वच अधिकारी दोषी नसतात, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. 


विधिमंडळ अधिवेशनाच्या (Nagpur Winter Session) दुसऱ्या आठवड्याचा तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात होत असून तत्पूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सर्वच अधिकाऱ्यांचे निलबंन योग्य नसल्याचे म्हटले. 


अनेक अधिकाऱ्यांचे निलंबन


अधिवेशन काळात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महसूल विभाग आणि पोलीस विभागासह अनेक विभागातील अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे दहा ते बारा अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे. यातील सर्वच अधिकारी दोषी नसल्याची माहिती असल्याचेही यावेळी पवार म्हणाले.


उदय सामंत यांची पवारांकडून पाठराखण


उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या बोगस डिग्रीचे प्रकरण पुढे आले आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की आमदार, मंत्री व्हायला संविधानाने, कायद्यातील नियमात जे सांगितले असते, ते बघायचे असते. बाकी डिग्री बोगस आहे की नाही, हे गौण असते. तसे उदय सावंत हे हुशार आहेत. त्यांच्या शिक्षण संस्था आहे. त्यांनी विद्यापीठ काढले आहे. त्यांच्यावर टीकाटिप्पणी करण्याचा मला अधिकार नाही. 10-10 डिग्री असलेले कसे काम करतात आणि कमी शिकून असलेलेही कसे काम करतात हे महत्वाचे असते. यावेळी चौथी शिकलेले वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या प्रभावी कामाचे उदाहरण यावेळी अजित पवार यांनी दिले.


...म्हणून शासकीय विमानाने पवार आज जाणार मुंबई


तातडीच्या प्रवासासाठी सरकारी विमान उपलब्ध करुन देण्यामागचं कारण अजित पवार यांनी सांगितलं. पवार म्हणाले की, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज सुटका होणार आहे. त्यांना मुंबईबाहेर कुठेही जाता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगलीहून मुंबईत येण्यास सांगितलं. माझा देखील मुंबईला जाण्याचा प्रयत्न आहे. हे सगळं होत असताना काल मला शिंदे साहेबांनी उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक घेत असल्याचं सांगितलं. उद्याऐवजी परवा बैठक घेतली तर बरं पडेल, असं मी त्यांना म्हटलं. कारण मी अकरा वाजताच निघणार होतो. तर त्यांनी सांगितलं की दहा वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक लावतो. तुम्हाला मी शासनाचं विमान उपलब्ध करुन देतो. त्यातून तुम्ही जा आणि काय काम आहे ते करुन परत या. त्यामुळे मी माझा कार्यक्रम बदलला. दिलीप वळसे पाटील आणि मी दुपारी एक वाजता शासनाच्या विमानाने मुंबईला जाणार आहोत. शासनाचं विमान कोणी वापरावं हा सर्वस्वी अधिकार हा राज्याच्या प्रमुखांचा असतो. मी पण विरोधी पक्षनेता आहे. मलाही कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. आम्ही देखील सत्तेत असताना कधी काही प्रसंग आला तर एकमेकांना सहकार्य करायचो. त्यामुळे कदाचित मी दुपारी एक वाजता शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या विमानाने मुंबईत जाण्याचं आणि त्याच विमानाने परत येण्याचं माझं नियोजन आहे. 


ही बातमी देखील वाचा...


Anil Deshmukh : 100 कोटींचा आरोप एक कोटीवर आला, जामीनानंतर देशमुखांच्या कार्यालयाचे खळबळजनक दावे