Nagpur News : नागपूर महानगरपालिकेने (NMC) 600 एमएम व्यासाच्या जलवाहिनीला 700 एमएम व्यासाच्या मेडिकल जलवाहिनीशी मोक्षधाम घाट येथे जोडण्याकरता येत्या 23 फेब्रुवारी रोजी 24 तासांचे शटडाऊन करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मेडिकल आणि अजनी रेल्वेच्या परिसरातील वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
या कामासाठी मेडिकल मुख्य जलवाहिनीवरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल GMC (मेडिकल कॉलेज) आणि नजीकचा संपूर्ण परिसर तसेच अजनी रेल्वे आणि नजीकचा संपूर्ण परिसर, त्याचबरोबर दक्षिण-पश्चिम-मध्य रेल्वे, टाटा कॅपिटल, गणपती अपार्टमेंट, इंदिरानगर स्लम, जाटतरोडी आणि राजाबाक्षा या भागांचा पाणीपुरवठा संपूर्णपणे बंद बंद राहणार आहे. पाणीपुरवठा 24 तारखेला दुपारपर्यंत सुरळीत होईल, असे ओसीडब्ल्यूतर्फे सांगण्यात आले आहे. या कालावधीत बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
काही वस्त्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा
जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे गोधनी पेंच 4 जलशुद्धीकरण केंद्रावर आधारित नागपूर शहरातील नारा, नारी/ जरीपटका, धंतोली, लक्ष्मीनगर, नालंदानगर, श्रीनगर, ओंकारनगर 1 आणि 2, म्हाळगीनगर या जलकुंभांतून वस्त्यांना होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने आणि मर्यादित राहणार आहे. 23 फेब्रुवारीच्या रात्रीनंतर पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. ही परिस्थिती किमान 5 ते 6 दिवस राहणार असल्याचे ओसीडब्ल्यूद्वारे कळविण्यात आले आहे.
मनपाच्या 'या' झोनमधील पाणीपुरवठा होणार थेट
- नेहरूनगर झोन आणि लकडगंज झोनमधील पाणीपुरवठा बळकटीकरण करण्याच्या हेतूने नागपूर महानगरपालिका आणि ओसीडब्ल्यू यांनी 4.2 किमी लांबीची 800 एमएम व्यासाची मोठी जलवाहिनी शताब्दी (चौक (रिंग रोड ) ते सक्करदरा जलकुंभदरम्यान टाकली आहे.
- या जलवाहिनीद्वारे सक्करदरा जलकुंभ आता गोधनी पेंच-4 या जलशुद्धीकरण केंद्राशी थेट जोडले जाणार आहे. त्यामुळे सक्करदरा 1, 2, 3 या जलकुंभाअंतर्गत येणाऱ्या नेहरूनगर झोनमधील आणि लकडगंज झोनमधील वस्त्या यांना अधीकचा 17 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार आहे.
- 4.2 किमी जलवाहिनीच्या फ्लशिंगचे काम पूर्ण झाले आहे. 23 फेब्रुवारीच्या रात्रीपासून जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. आतापर्यंत सक्करदरा 1, 2 आणि 3 या जलकुंभाला कन्हान जलशुद्धीकरण केंद्रावरुन पाणीपुरवठा होत होता.