Black Idli In Nagpur : मुळची दक्षिण भारतातली मात्र आता अखिल भारतीय खाद्यपदार्थ म्हणून रोज कोट्यवधी भारतीयांकडून खाल्ली जाणारी इडली मुळात पांढऱ्या रंगाची असते. मात्र नागपुरात एका प्रयोगशील इडली प्रेमीने चक्क काळी इडली तयार केली आहे. ही इडली नागपूरकरांच्या पसंतीसही उतरली आहे. "चारकोल इडली" नावाने ही काळी इडली सध्या नागपुरात प्रसिद्ध झाली आहे. या इडलीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.  करत आहे. गलेलठ्ठ पगाराची मोठ्या हॉटेलची नोकरी सोडून इडलीत प्रयोग करणारे अण्णा रेड्डी यांनी नागपुरात काळी इडली तयार केली आहे.

  


नारळाचा खोल, संत्र्याची साल, बीट रूटचा पल्प असे पदार्थ वापरून ही खास चारकोल इडली तयार केली जाते. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात कदीम बाग नर्सरी जवळ कुमार रेड्डी यांच्या स्टॉलवर पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंतच या चारकोल इडलीचा आस्वाद घेता येते.. सकाळी वॉकर्स स्ट्रीटवर मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागपूरकर या चारकोल इडली सह शंभर प्रकारच्या वेगवेगळ्या इडलीचा आस्वाद रेड्डी अण्णाच्या स्टॉल वर घेतात. अण्णा रेड्डीकडे इडलीची चव शब्दातून नव्हे, तर खाण्याचे अनुभवातूनच घेता येते अशी प्रतिक्रिया बहुतांशी खवय्ये देतात.


पांढऱ्यासह काळ्या इडलीचा प्रयोग करणारे कुमार उर्फ अण्णा रेड्डी मूळचे आंध्र प्रदेशातले. मात्र, त्यांचा जन्म आणि शिक्षण नागपूर जवळच्या कामठीला झालाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या हॉटेल्स सोबत काम केलेल्या अण्णा रेड्डींना चांगला पगार असतानाही कामाचं समाधान मिळत नव्हतं. बर्गर आणि पिज्जामध्ये न अडकता त्यांनी भारतीय पाककलेत डोकावले... आणि लहानपणापासूनच भारतीय खाद्यपदार्थांची आणि खास करून इडलीची आवड असल्यामुळे 2016 मध्ये "ऑल अबाउट इडली" या नावाने इडल्यावर वेगवेगळे प्रयोग सुरू केले. आजवर इडल्यांचे 100 पेक्षा जास्त प्रकार बनवणाऱ्या अण्णा रेड्डींना काळ्या इडलीनेच खरी ओळख दिली...


काळ्या इडली मध्ये नारळाचा खोल वापरल्यामुळे ती इतर इडल्यांपेक्षा दाणेदार असते. सोबत चारकोलची हलकी चव देते.. अण्णा रेड्डींची खासियत म्हणजे ते इडली सोबत कधीच सांभार देत नाहीत. त्यांच्याकडे इडलीचे 100 पेक्षा जास्त प्रकार असून त्यांची चव विविध चटण्यासोबतच चाखता येते. अण्णांच्या मते प्राचीन दाक्षिणात्य पाककलेत इडली सोबत सांभर देण्याची परंपरा नाही. ती अलीकडील काळात रुजली असून आंध्रातल्या परंपरेप्रमाणेच मी लोकांना इडली वाढतो. 


अण्णा रेड्डी यांनी त्यांच्याकडील इडल्यांचे प्रकार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाज माध्यमांचाही चांगला वापर केला आहे. त्यांच्या मेनू कार्डमध्ये 100 पेक्षा जास्त प्रकारच्या इडली असल्यामुळे ते रोज पाच ते सहा प्रकारच्या इडल्या तयार करतात. खास बाब म्हणजे दुसऱ्या दिवशीचा मेनू व्हाट्सअपच्या माध्यमातून रोज हजारो नागपूरकरांना ते उपलब्ध करून देतात आणि आपापल्या चवीप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांच्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी दिसते.