Nagpur Crime News : शहरात खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दर दुसऱ्या दिवशी शहरात एखाद्या गुन्हेगाराकडून (Nagpur Crime) दुसऱ्या गुन्हेगाराची हत्या झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यातूनच रविवारी (8 जानेवारी) रात्री शहरात दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटना घडल्या. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचे वचक आहे की नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.


एकीकडे शहरात नियमित गँगवार होत असून यातून खुनासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत तर दुसरीकडे वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण नसल्याने रस्ते अपघातात निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत. तरी देखील नागपूर गुन्हेगारी नियंत्रणात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या आणि गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई केल्याबद्दल नागपूर पोलीस आयुक्तालयाला राज्यातील सर्वोत्कृष्ट युनिटचा (2021) मान मिळाला आहे, हे विशेष.


हिंगणामध्ये पत्नीच्या चारित्र्याबद्दल अपशब्द वापरल्याने हत्या


पहिल्या घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आपल्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल अपशब्द वापरल्याने मुख्य आरोपीने दुसऱ्याची हत्या केली. प्राप्त माहितीनुसार दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून अवैध जुगार आणि गांजाची विक्री करायचे. रविवारी रात्री दोघेही सोबत असताना मृताने मुख्य आरोपीच्या पत्नीच्या चारित्र्यावर भाष्य केले. त्यातून दोघांचाही वाद झाला. हा वाद नंतर विकोपाला गेला. त्यातून आरोपीने साथीदारावर गोळ्या झाडून त्याला ठार केले. ही घटना श्रीकृष्ण नगरात रात्री अकराच्या दरम्यान घडली. पोलिसांकडून आपल्या ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरु असल्याची माहिती असूनही त्यांच्यावर 'कृपादृष्टी' ठेवण्यात येत असल्याने गुन्हेगारांचेही मनोबल वाढल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. आरोपी आणि मृताच्या अधिक माहिती आणि नावांबद्दल हिंगणा पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.


दुचाकीचा लागला कट, वादातून एकाचा खून


दुचाकीचा कट लागला या वादावरुन नागपुरात एकाची हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत विजयनगर परिसरातील रविवारी (8 जानेवारी) रात्री दहा वाजता ही घटना घडली. लक्ष्मीनारायण उर्फ अजय थट्टू चंदानिया (वय 21 वर्षे, रा. कामठी) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. गेल्या आठ दिवसातील नागपुरातील ही हत्येची तिसरी घटना आहे. विजयनगर परिसरात लक्ष्मीनारायण आणि त्याचा मित्र दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीला आरोपीच्या दुचाकीचा कट लागला. अपघातात दुचाकीचे नुकसान झाल्यानंतर लक्ष्मीनारायण आणि त्याच्या मित्राने आरोपीकडे नुकसान भरपाई मागितली. त्यातून वाद वाढत जाऊन दुसऱ्या दुचाकीवर असलेल्या दोन्ही आरोपीने लक्ष्मीनारायणची धारदार शस्त्र भोसकून हत्या केली. तर त्याच्या मित्रालाही गंभीर जखमी केले आहे.


ही बातमी देखील वाचा...


नागपुरात नायलॉन मांजामुळे कापला 5 वर्षीय चिमुकलीचा गळा, 26 टाकेही पडले