Nagpur Weather News : आठवड्याभरापासून असलेले ढगाळ वातावरण नाहीसे होताच विदर्भातील थंडीच्या लाटेने उग्ररूप धारण केले आहे. रविवारी (8 जानेवारी) किमान तापमानाने या वर्षातील 8 अंशांचा नवा निचांक नोंदवल्याने नागपूरकरांसाठी रविवारची रात्र यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधिक थंडगार होती. तर विदर्भातील गोंदिया येथे लागोपाठ दुसऱ्या दिवशी विदर्भासह संपूर्ण राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. शीतलहरीसाठी सध्या अनुकूल वातावरण असल्याने थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली.


उत्तर भारतातील पहाडी भागांमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरु असल्याने मध्य भारतात थंडीची तीव्र लाट पसरली आहे. लाटेचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाणवत आहे. कडाक्याच्या थंडीने अख्ख्या विदर्भालाच आपल्या कवेत घेतले. शनिवारच्या (7 जानेवारी) तुलनेत नागपूरचा पारा आणखी दोन अंशांनी घसरुन यंदाच्या मोसमात तिसऱ्यांदा दहाच्या खाली आला आहे.


मागील धूलिकणांचे प्रमाण वाढल्याने आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे हवेची गुणवत्ता खालावली. त्यामुळे श्वसनाचे विकार असलेल्यांनी अधिक काळजी घ्यावी. शारीरिक परिश्रमाचे काम टाळावे, जास्त वेळ बाहेर राहणे टाळावे, बाहेर पडत असल्यास मास्कचा वापर करावा, असा सल्ला दिला जात आहे.


जानेवारीत थंडीचा कहर!


1996 साली 7 जानेवारी रोजी नागपूरचे किमान तापमान 3.9 अंश नोंदवण्यात आले होते, जे जानेवारी महिन्यात नोंदवलेले आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान होते. यंदा डिसेंबर महिन्यात थंडीऐवजी उष्णता जाणवली. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये थंडी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.


दहा वर्षातील सर्वात कमी तापमान (अंशामध्ये)



  • 9 जानेवारी 2013 - 5.6

  • 29 जानेवारी 2014 - 9.5

  • 10 जानेवारी 2015 - 5.3

  • 23 जानेवारी 2016 - 5.1

  • 13 जानेवारी 2017 - 7.2

  • 27 जानेवारी 2018 - 8

  • 30 जानेवारी 2019 - 4.6

  • 11 जानेवारी 2020 - 5.7

  • 31 जानेवारी 2021 - 10.3

  • 29 जानेवारी 2022 - 7.6


आरोग्याची घ्या काळजी


हिवाळा म्हणजे आनंद लुटण्याचा ऋतू. मकरसंक्रांतीच्या पर्वावर हिवाळ्याचा मनमुराद आनंद लुटताना आलेल्या शीतलहरीकडे दुर्लक्ष करु नका. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी दिवसभर हिटर, ब्लेअर लावून खोलीत बसता येत नाही. कष्टकरी असो की नोकरदार साऱ्यांना घराबाहेर जावे लागते. शीतलहरीकडे गांभीर्याने बघत आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शीतलहरीबाबत निष्काळजीपणा आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो, असा सूचक इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला. ज्येष्ठांसह लहान मुलांना थंडीपासून संरक्षण देण्याची गरज आहे. तापमान 10 अंश किंवा त्याहून कमी होते, तेव्हा या स्थितीला शीतलहर (थंडीची लाट) किंवा कोल्ड वेव्ह म्हणतात, थंड वाऱ्यांमुळे सर्दी, खोकल्यासोबतच डोकेदुखी, छातीत जडपणा आणि वेदना होतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.


ही बातमी देखील वाचा...


अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी USIEF फेलोशिप; जाणून घ्या अर्ज प्रक्रियेबद्दल...