नागपूर: नूतन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना- बिदरी यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. प्रभारी विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला. विजयालक्ष्मी प्रसन्ना -बिदरी यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, (इस्रो) येथे नियंत्रक पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत होत्या. जिल्हाधिकारी आर. विमला, उपायुक्त आशा पठाण, उपायुक्त मंजूषा ठवकर, सहायक आयुक्त हरिष भामरे उपस्थित होते.


प्रसन्ना- बिदरी भारतीय प्रशासकीय सेवेतील 2001 च्या तुकडीच्या अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी सहाय्यक आयुक्त, तेजपूर, गुवाहाटी (आसाम) म्हणून काम केले आहे. त्यानंतर सहाय्यक आयुक्त, हिंगोली (महाराष्ट्र), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सिंधुदुर्ग), जिल्हाधिकारी (सिंधुदुर्ग), महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव, महाराष्ट्र महिला विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक, संचालक माहिती तंत्रज्ञान, विभाग, महाराष्ट्र शासन, त्यानंतर विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.


2001च्या टॉपर, आयएएस-आयपीएस कुटुंबाचा वारसा


विजयालक्ष्मी या 2001च्या अखिर भारतीय सेवा परीक्षेतील टॉपर आहेत. प्रशासनाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांचे कुटुंब हे आयएएस-आयपीएस असलेले कुटुंब म्हणून प्रसिद्ध आहे. कुख्यात चंदन तस्कर विरप्पन यांना ठार मारणारे प्रसिद्ध आयपीएस अधिकारी शंकर महादेव बिदरी हे त्यांचे वडील होत. त्या बंगळुरु येथील यूआरएससीच्या नियंत्रक पदावर प्रतिनियुक्तीवर होत्या. त्यांच्या केंद्रीय प्रनिनियुक्तीचा कार्यकाळ 20 जानेवारीला 20 महिन्यांसाठी वाढवून देण्यात आला होता.


मनपा आयुक्तांकडे होती जबाबदारी


विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला होता. त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर डॉ. माधवी खोडे यांच्याकडे विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी आली. त्यांची मूळ नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर होती. त्यांना आय़ुक्त पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्या सध्या प्रशिक्षणासाठी गेल्या आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. हे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत.


Maharashtra Congress : उत्तर महाराष्ट्रातला एक, मराठवाड्यातील तीन, काँग्रेसच्या सात गद्दार आमदारांची यादी तयार?