Heat Wave : विदर्भातील अनेक जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत आहे. पुढील चार ते पाच दिवसात नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात 5 ते 7अंशांची वाढ होऊन पारा चाळिशी पार जाणार आहे. नागपूरसह (Nagpur News) शहराच्या तापमानात देखील वाढ होत आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही
पुढील चार ते पाच दिवसात नागपूर सह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात 5 ते 7 अंशांची वाढ होऊन पारा चाळिशी पार जाण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी कमाल तापमान 43 अंशावर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. संपूर्ण एप्रिल महिना आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जोरदार उपस्थिती लावत उन्हाळ्यावर मात केली होती. आता मात्र खऱ्या विदर्भाच्या उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे एप्रिल महिन्यात सामान्यपणे नागपूर आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात सरासरीने सहा ते आठ मिलिमीटर पावसाची नोंद होते. मात्र यावर्षी सर्वच जिल्ह्यांमध्ये 60 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून नागपूर जिल्ह्यात 68 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सरासरीपेक्षा 10 पट जास्त अवकाळी पाऊस झाल्यामुळे एप्रिल महिन्यात तापमान वाढ झाली नव्हती. एप्रिल महिन्यात एकही दिवस हिटवेव्हला सामोरे जावे लागले नव्हते. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही विदर्भात सर्वत्र कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.
आता मात्र कमाल तापमानात तीव्रतेने वाढ होत जाईल आणि पुढील चार ते पाच दिवसात अनेक ठिकाणी कमाल तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उष्माघातावर त्वरीत उपचार करणे आवश्यक
रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमाण खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे महत्वाचे आहे. रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरीत उपचार सुरु करावे. रुग्णाचे कपडे सैल करुन त्वरीत अंग थंडपाण्याने शरीराचे तापमान कमी होई पर्यंत पुसत रहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, ऐअर कंडिशनर्स त्वरीत चालू करावे. रुग्ण शुध्दीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवणी दयावे व डिहायड्रेशन टाळावे, चहा कॉफी देवू नये. तसेच रुग्णाच्या काखेखाली आईसपॅक ठेवावेत. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत रहावे व 36.8 सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावे.