नागपूर: नागपूरमध्ये (Nagpur News) 20 ते 22 मार्च दरम्यान जी 20 संमेलन झाले. आता यावर झालेल्या खर्चाची आकडेवारी पुढे आली आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेले 122 कोटी व पालिकेने स्वतः खर्च केलेले 30 कोटी असे एकूण 152 खर्च करण्यात आले होते. मात्र शहरात त्यानिमित्त केले गेलेले काम व त्याचा दर्जा बघितला तर सध्या नागपूरमध्ये यावर झालेल्या खर्चाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे याच्या चौकशीची मागणी आता पुढे येत आहे.
नागपूरमध्ये झालेल्या जी 20 संमेलनाचे हे दृश्य बघितले तर तेव्हा नागपूरमध्ये कार्निवल असल्याचे वाटत होते. आता या संमेलनाच्या सजावटी व इतर कामासाठी केलेल्या खर्चाची यादी पुढे आली आहे. वेगवेगळ्या 93 विकास कामांसाठी 122 कोटी व पालिकेने स्वत: खर्च केलेले 30 कोटी असे 152 कोटी खर्च करण्यात आले. एक उदाहरण घ्याचे तर विमानतळ सजावटीसाठी 4 कोटी 45 लाख खर्च करण्यात आले. मात्र हा निधी प्रत्यक्ष कुठे खर्च केला अजून त्याची माहिती किंवा देयक पालिकेकडे यायचे असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अशीच स्थिती 193 ही काम संदर्भात आहे.
आज नागपूर शहरातील रस्त्याची स्थिती बघितली तर काही ठिकाणी हा निधी खर्च केल्याची अनुभूती येते. मात्र अनेक ठिकाणाची स्थिती पूर्ववत झाली आहे. लावलेली रोषणाई काढण्यात आली. काही ठिकाणी तर टाईल्स उखडले तर काही ठिकाणी काम अर्धवट आहे. त्यामुळे निविदा नियमाचे उल्लंघन करत हा निधी खर्च केल्याने या मोठी अनियमितता झाल्याने याच्या चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. जी 20 संमेलन नीट पार पडले मात्र दीडशे कोटी खर्च झाल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात कायापालट दिसायला हवा होता मात्र तो दिसत नसल्याने निधी खर्चावरून वेगवेगळी चर्चा रंगली आहे.
नागपुरात प्रशासनाने स्वच्छता आणि सौंदर्यकरणाची जय्यत तयारी केली आहे. शिवाय शहरात रात्रीच्या वेळेलाही वेगवेगळ्या रंगाच्या आकर्षक लाइट्सचा झगमगाट राहावं यासाठी नागपुरातील हजारो झाडांवर लाखो खिळे ठोकून विजेच्या रंगीत माळा, मोठ्या लाइट्स, हॅलोजन, पार लाइट्स लावण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक झाडावर 35 ते 45 मोठे खिळे, म्हणजेच पूर्ण नागपुरात चार लाखांपेक्षा पेक्षा जास्त खिळे झाडांवर ठोकले आहेत. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष जतन अधिनियम अन्वये झाडांवर खिळे ठोकण्यासह कुठलीही लोखंडी वस्तू ठोकण्यावर बंदी आहे. असे असताना अवघ्या दोन दिवसांच्या परदेशी पाहुण्यांच्या आगमनाच्या निमित्ताने प्रशासनाकडून हजारो वृक्षांवर लाईट लावण्याच्या नावाखाली लाखो खिळे ठोकण्यात आले आहेत.