नागपूर : कोरोनाच्या दोन ते अडीच वर्षाच्या संकटाच्या काळातून यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करीत असताना पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षा जपण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे (Nagpur Municipal Corporation) करण्यात आले आहे. 


मनपाच्या या आवाहनाला प्रतिसादही मिळत असून शहरातील गणेश मंडळांमध्ये (Nagpur Ganesh Mandal) कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोसची (Booster Dose) व्यवस्था करण्यात आलेली आहे. या संकल्पनेला गणेश मंडळ आणि नागरिकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण नागपूर शहरातील विविध गणेश मंडळांमध्ये आतापर्यंत 1529 जणांनी बुस्टर डोस घेतला आहे. 31 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन झाल्यानंतर शहरातील गणेश मंडळांनी मनपाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने आपापल्या गणेश मंडळांमध्ये लसीकरणाचे सत्र आयोजित केले. याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दर्शवित यंदाचा गणेशोत्सव हा निर्बंधमुक्तीचा आणि आरोग्यात्मक सुरक्षिततेचा असल्याचे सिद्ध केले आहे. आतापर्यंत 59 गणेश मंडळांमध्ये लसीकरणाचे सत्र बोलाविण्यात आले. ज्यामध्ये 1529 जणांनी बुस्टर डोस घेतले आहे. शुक्रवारी शहरातील 42 गणेश मंडळात बुस्टर लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 1147 जणांना लसीची मात्रा देण्यात आली.


नागपूर शहरात 3 लाख 43 हजार 84 नागरिकांनी घेतला बुस्टर डोस
 
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मनपाद्वारे शहरातील सर्व गणेश मंडळांमधून कोव्हिडच्या बुस्टर डोस व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाद्वारे गणेश मंडळातून बुस्टर दिले जात असून पात्र प्रत्येक व्यक्तीने बुस्टर डोस घेउन आपले लसीकरण (vaccination) पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासनाने कोव्हिड लसीकरणाच्या मोहिमेत चांगली भरारी घेतली. आतापर्यंत नागपूर शहरातील 12 वर्षावरील 21,91,094 लोकांनी पहिला तर 17,75,872 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे तिस-या व चवथ्या लाटे दरम्यान फारसा धोका निर्माण झालेला नाही. आतापर्यंत 343084 इतके बुस्टर डोस देण्यात आले आहेत.


कोरोनाविरुद्ध लसीचे शस्त्र


देशात व जगातील अनेक भागात अजूनही कोरोनाचे रुग्ण‍ आढळत आहेत. कोव्हिड विषाणू नवनवे रुप घेऊन आपल्यावर हल्ला करण्यास सज्ज आहे. अशा परिस्थितीत 18 वर्षावरील सर्व पात्र व्यक्तीने लवकरात लवकर बुस्टर डोस घ्यावा, ज्यामुळे आपण व आपला परिवार कोव्हिड या जागतिक महामारीपासून सुरक्षित होईल. याकरीता सर्व नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट ही अत्यंत भयंकर आणि जीवघेणी ठरली. वैद्यकीय क्षेत्रातील विविध संशोधनातून कोरोनापासून बचावासाठी मोठे शस्त्र म्हणून लस पुढे आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक लस ही सुरक्षेचे मोठे शस्त्र ठरले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


PM kisaan Yojna : पीएम किसान योजनेसाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे, अशी करा ऑनलाइन KYC


Nagpur News : शासकीय कार्यालयातील 'लेटलतिफांना' जिल्हाधिकाऱ्यांचा झटका, सर्व शासकीय कार्यालयांना बायोमेट्रीक अनिवार्य