नागपूर: नागपूर जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी उद्या शनिवार व रविवार या दोन दिवसात पीएम किसान (PM Kisaan) सन्मान निधीच्या संदर्भातील आपली माहिती एक तर स्वतः किंवा सुविधा केंद्रांमधून भरून सादर करण्याचे आवाहन नागपूर जिल्हा प्रशासनाने केले आहे. दोन्ही दिवस जिल्ह्यातील महसूल यंत्रणा यासाठी कार्यरत असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील किसान सन्माननिधीमध्ये शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरवले आहे.या संदर्भात आज जिल्हाधिकारी (Nagpur Collector) डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी (CEO) अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
सुट्टीच्या दिवशीही सुविधा केंद्र सुरु
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने पात्र शेतकऱ्यांनी केवायसी (KYC) भरण्याचे काम सुरू आहे. मात्र या कामात एकीकडे नरखेड ने 72 टक्के काम केले असले, तरी नागपूर ग्रामीणमध्ये केवळ 32 टक्के काम झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याची सरासरी 63 टक्के असून 100% केवायसी चे काम पूर्ण करण्याबाबत सर्व तहसीलदार व महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे. ज्या ज्या ठिकाणी सुविधा केंद्र आहेत ते सर्व सुविधा केंद्र सणासुदीच्या व सुट्टीच्या दिवसातही दोन दिवस सुरू राहतील. केवळ पंधरा रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आपली माहिती भरता येणार आहे. त्यामुळे कोणीही या लाभापासून वंचित राहू नये असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
7 सप्टेंबरपर्यंत मुदत
पीएम किसान सन्मान निधीच्या ऑनलाईन केवायसीची (Online KYC) मुदत आता 7 सप्टेंबर 2022 पर्यंत करण्यात वाढविण्यात आली आहे. तथापि, जिल्ह्यात पुढील दोन दिवसातच हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन केवायसी केल्यास त्यांच्या खात्यात सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. ऑनलाईन केवायसी केले नाही तर सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. सदर योजना ओटीपीवर आधारित असून लाभार्थी शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक पीएम किसानचे वेबपोर्टल किंवा जवळच्या कॉमन सर्विस सेंटरशी सलग्न असावा.
अशी करा ऑनलाइन KYC
ओटीपी मोड (मोबाईलद्वारे / संगणकाद्वारे) : पीएम किसानच्या अधिकृत वेब पेजला https://pmkisan.gov.in/ भेट द्या. वेब पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ई-केवायसी पर्यायाला क्लिक करा. स्वतःचा आधारकार्ड क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून सर्च करा. आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका आणि क्लिक करा. ओटीपी आल्यानंतर संबंधित जागेवर ओटीपी भरा व सबमीट करा. बायोमेट्रीक मोड (महा ई सेवा केंद्रातून) : नजीकच्या नागरी सेवा केंद्रावर (सीएससी) जाऊन प्रक्रिया करता येईल. तसेच ई-सेवा केंद्रावर जातांना आपल्या आधारकार्डची झेरॉक्स सोबत घेऊन जा. वरीलप्रमाणे ई – केवायसी पूर्ण करा आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या