भंडारा : सरकार हे विषकन्येसारखं असतं, ज्या ठिकाणी सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो, सरकारी अधिकाऱ्यांना कन्व्हेन्स करता करता डोक्यावरील केस उडून जातात अशी उद्विग्न प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली. भंडारा ते पवनी हा रस्ता हा केवळ वनविभागाच्या जाचक अटींमुळे गेल्या 12 वर्षांपासून बंद पडला आहे, त्या ठिकाणच्या नतद्रष्ट फॉरेस्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना आत घाला असंही ते म्हणाले. भंडाऱ्यातील पवनी येथील  ग्रामीण विकास संस्थेच्या वतीनं आनंद विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.


नितीन गडकरी म्हणाले की, "सरकारच्या कुठल्याही कामात हस्तक्षेप करायचं नाही, मदतही घ्यायचं नाही. मी नेहमी गमतीनं म्हणतो की, सरकार विषकन्येसारखा आहे. जिथं सरकारची मदत मिळते तिथं तो प्रयोग बंद पडतो. म्हणून मी कुठल्याही सरकारची मदत घेत नाही, सरकारच्या अधिकाऱ्यांकडे जात नाही. अधिकाऱ्यांना कन्व्हेन्स करता करता डोक्यावरचे केस उडून जातात."


गरीबाला कोणतीही जात-धर्म नसतो


नितीन गडकरी म्हणाले की, "समाजात कोणी धर्म नाही आणि जाती नाही. गरिबाला जात, पंथ, धर्म आणि जाती नसते, त्यामुळे मानवतेच्या आधारावर विचार केला पाहिजे. महिला, पुरुष, कामगार आणि शेतकरी अशा चारच जाती आहेत. माणूस हा जातीनं नाही तर गुणानं मोठा आहे. या समाजातील अस्पृश्यता, जातीयता नष्ट झाली पाहिजे आणि मानवतेच्या सिद्धांताच्या आधारावर माणसाचं कल्याण झालं पाहिजे."


वनविभागाच्या जाचक अटींमुळे 12 वर्षांपासून रस्ता नाही


भंडारा ते पवनी या मार्गासाठी निधी मंजूर झालेला असताना केवळ वन विभागाच्या जाचक अटीमुळे हा मार्ग रखडलेला आहे असं नितीन गडकरींनी सांगितलं. या मार्गाच्या बांधकामासाठी वनाधिकाऱ्यांसोबत अनेकदा मीटिंग घेतल्या. मात्र वनाधिकाऱ्यांनी 12 वर्षांपासून तो थांबून ठेवला असल्याची खंत खुद्द केंद्रीय रस्ते निर्माण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. 


नतद्रष्ट फॉरेस्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना आत टाका


या रस्त्याच्या बांधकामासाठी अनेकदा मीटिंग घेतल्या, मात्र काम थांबलेलं असल्यानं गडकरी यांनी भंडाऱ्याचे कलेक्टर आणि एसपींना भाषणादरम्यान विनंती करून आपण वैतागलो असल्याची उद्विग्ध प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी वन अधिकाऱ्यांचा नतद्रष्ट फॉरेस्ट अधिकारी असा उल्लेख करत, जिल्हा पोलीस अधीक्षकांना नवीन कुठलं कलम असल्यास ते लावून, हा रस्ता बांधकाम थांबवलेल्या वनाधिकाऱ्यांना आतमध्ये घाला असं वक्तव्य केलं.


ही बातमी वाचा: