Private travels over charge : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. परिणामी रेल्वेचे कनफर्म तिकीट मिळत नाही. याच संधीचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स संचालकांकडून नागरिकांकडून अतिरिक्त दर आकारण्यात येत आहे. या जादा तिकीटदर वसूलीविरोधात आता नागपूर प्रादेशिक परिवहन विभागाने कंबर कसली असून नागरिकांनी तक्रार केल्यास ट्रॅव्हल्स संचालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांनी दिली.
उन्हाळ्यात तसेच सणासुदीच्या काळात प्रवाश्यांची चांगलीच वर्दळ असते. त्यामुळे रेल्वेमध्येही कनफर्म तिकीट मिळणार याची खात्री नसते. याचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकीटाच्या दरात दुप्पट ते तिनपट वाढ करण्यात येते. ट्रॅव्हल्स चालकांच्या या मनमानीला आता चाप बसणार असून नागरिकांनी तक्रार केल्यास आरटीओकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या 27 एप्रिल 2018 रोजीच्या परिपत्रकानुसार खासगी बस संचालकांना एसटी महामंडळाच्या तिकीट दरांपेक्षा 50 टक्क्यांपेक्षा अतिरिक्त दर प्रवाश्यांकडून घेता येत नाही. याचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची तरतूद आहे. तसेच खासगी बस संचालकांना सुट्टीच्या काळात अथवा सणासुदीच्या काळात जादा भाडे किंवा कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारु नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. तसेच विविध अंतरावरील दर फलक आपल्या कार्यालयात लावण्याचे निर्देशही ट्रॅव्हल्स संचालकांना देण्यात आले असल्याचे रविंद्र भुयार यांनी सांगितले.
येथे करा तक्रार
ट्रॅव्हल्स चालक जादा भाडे आकारत असल्यास नागरिकांनी थेट 18002333388 या टोलफ्री क्रमांकावर किंवा dycommer.enf2@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी. यावर आरटीओच्या पथकाकडून तत्काळ कारवाई करण्यात येईल असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Uttarakhand Accident : उत्तरकाशीमधील अपघातात विदर्भातील दोन भाविकांचा मृत्यू
Nagpur : तब्बल 110 कोटी रुपये खर्चून भव्य पोलीस भवन बांधलं, पण पहिल्याच पावसात छत कोसळलं