Uttarakhand Accident : उत्तराखंड येथे झालेल्या भिषण अपघातात विदर्भातील दोघांसह मुंबईतील वाहन चालकाचा मृ्त्यू झाला आहे. मृतकांमध्ये नागपूर येथील 40 वर्षीय अशोक महादेवराव शांडे, भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील रहिवासी 23 वर्षीय जयश्री अनिल कोसारे आणि मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी पुर्णनाथ पुत्र भोपाल नाथ यांचा समावेश आहे. वाहन यमुनोत्री धामावरुन बडकोट कडे येत असताना हा अपघात झाला.


उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर ओझरी ते सायना चाटी दरम्यान महाराष्ट्रातील 13 प्रवाश्यांना घेऊन महिंद्र बोलेरो गुरुवारी सायंकाळी जानकीछत्ती येथून बडकोटकडे रवाना झाले. रात्री उशीरा हे वाहन यमुनोत्री धामपासून 28 किमी अंतरावर असलेल्या ओझरीजवळ पोहोचले. बसला बाजू देताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.


चालकाचा ताबा सुटल्याने भाविकांना घेऊन जाणारी बस 150 मिटर खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच बडकोट येथील पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळ गाठून बचाव कार्य सुरु केले. रात्रीची वेळ असल्याने बचावपथकालाही बचाव कार्यात अडचणी आल्या. 13 भाविकांमध्ये 9 प्रौढ तर 4 बालकांचा समावेश होता. जखमी दहा प्रवाश्यांना बडकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी नौगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविल्यात आले आहे.


जखमींमध्ये नागपूर जिल्ह्यातील मृतक अशोक शेंडे यांची मुलगी अमु अशोक शांडे (वय 4), मृतकाची पत्नी रचना अशोक शांडे (वय 38), दिनेश किशन विधायक (वय 35), मोनिका बालक्रिष्णा कोसारे (वय 24), क्रिशीता अशोक शांडे (वय 15), कोशी प्रशांत  धुर्वे (वय 10), लक्ष्मी बालक्रिष्णा (वय 46), प्रेरणा प्रशांत (वय 8) यांचा तर भंडारा जिल्ह्यातील बालकृष्ण जितू कोसारे (वय 41) यांचा समावेश आहे.


डोळ्यांसमोर वडिलांचा मृत्यू


नागपूरातील रहिवासी अशोक शांडे यांची पत्नी आणि मुलीला घेऊन दर्शनाला गेले होते. मात्र अपघातात अशोक यांचे निधन झाले तर मुलगी अमू आणि पत्नी रचना ह्या जखमी झाल्या आहेत. डोळ्यांसमोर अशोक यांचे निधन झाले असल्याने चार वर्षीय चिमुकलीला जबर धक्का बसला आहे.