नागपूरः एकीकडे शहरात RTPCR चाचण्या आणि आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी वाढत चालली आहे. तर दुसरीकडे बाधितांना रुग्णालयात भरती करण्याची संख्याही दररोज वाढत आहे. मात्र तरी प्रशासनाकडून कोरोना चाचण्या वाढविण्याबद्दल उदासिन दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात सोमवारी फक्त 544 RTPCR चाचण्या करण्यात आल्या तर फक्त 88 रॅपिड अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. दररोज वाढती रुग्णसंख्येकडे आत्ताच गांभीर्याने बघितले नाही तर बाधित संख्येचा स्फोट होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.


जिल्ह्यातील एकूण 1496 सक्रिय बाधितांपैकी 90 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर 1406 बाधित गृहविलगीकरणात आहेत. सोमवारी आढलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी शहरातील 60 आणि ग्रामीणमधील 24 बाधितांचा समावेश आहे. असे एकूण सोमवारी फक्त 84 बाधितांची नोंद विभागाच्या अहवालात आहे. तर आज 66 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यापैकी 56 बाधित शहरातील तर 10 बाधित ग्रामीणमधील आहे. सोमवारी दहा मनपा झोन असलेल्या शहरात फक्त 442 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. तर 102 चाचण्या ग्रामीणमध्ये करण्यात आल्या. दुसरीकडे ग्रामीणमध्ये फक्त 5 रॅपिड अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. तर शहरात फक्त 83 चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे प्रशासन कोरोनाबाबत किती गंभीर आहे हे दिसून येत आहे.


90 कोरोना बाधित पोहोचले रुग्णालयात


सध्या प्राप्त माहितीनुसार 90 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 1406 नागरिक गृहविलगीकरणात आहेत. रुग्णालयात भरती बाधितांपैकी 9 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात, 2 बाधित मेयोमध्ये, 11 बाधित किंग्सवे हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित रेल्वे हॉस्पिटलमध्ये, 4 बाधित क्रिटीकेअर रुग्णालयात, 9 बाधित वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये, 2 बाधित Aureus हॉस्पिटलमध्ये, 7 बाधित एम्समध्ये, 2 बाधित सनफ्लावर हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित दंदे हॉस्पिटलमध्ये,10 बाधित विवेका हॉस्पिटलमध्ये, कल्पवृक्ष हॉस्पिटलमध्ये 2, डॉ. गायकवाड हॉस्पिटलमध्ये 2, क्यूअर इट हॉस्पिटलमध्ये 1, सेंट्रल क्रिटीकल हॉस्पिटलमध्ये 2, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये 1 आणि 2 बाधितांवर मेडीट्रिना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.