Mahavitaran Strike Nagpur : खासगीकरणाला विरोध म्हणून राज्यभरातील महावितरण, महापारेण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांतील कर्मचारी काल, मंगळवारला मध्यरात्री 12 च्या ठोक्यापासून संपावर गेले आहेत. तर दुसरीकडे विदर्भातील अनेक गावांत काल पावसाने हजेरी लावल्याने अनेक गावांची बत्ती गूल झाल्याची माहिती आहे. कर्मचारी काल रात्रीपासून संपावर असल्याने काल रात्रीपासून विदर्भातील अनेक गावे अंधारात असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुसरीकडे कामगारांच्या जवळपास सर्वच संघटनांनी सहभाग नोंदविल्याने शंभर टक्के कर्मचारी संपावर असल्याचा दावा कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. यामुळे वीज यंत्रणा रामभरोसे असून राज्य अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


शहरातील संविधान चौक, कोराडी येथील उर्जा प्रकल्प आदी ठिकाणी संपात असलेले कर्मचारी सहभागी झाले असून खासगीकरणाविरोधात निदर्शने करत आहेत.


दहा हजार कर्मचारी संपावर


नागपुरातील तिन्ही कंपन्यांचे सुमारे दहा हजार कर्मचारी संपावर गेल्याचा दावा केला जात आहे. अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने विद्युत नियामक आयोगाकडे वीज वितरणाच्या परवान्याची मागणी केली आहे. याविरोधात वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर गेले आहेत. पूर्वी 30 संघटनांनी संपात सहभागाची तयारी दर्शविली होती. प्रत्यक्षात मात्र सर्वच संघटना सहभागी झाल्या असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. आऊटसोर्सिंगगचेही कर्मचारी संपात सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 


रजेवर असणाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द


रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करुन कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले. असहकार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. तरीही कर्मचारी संपावर गेले आहेत. आता कोणत्याही स्थितीत माघार नाही, अशा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे. महाजनकोने मुंबई येथे कार्यरत अभियंत्यांना वीज केंद्रात तैनात केले आहे. दुसरीकडे महावितरणने अन्य सरकारी संस्था व एजन्सींच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. तर महापारेषणने पॉवर ग्रीडची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.


कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन


मंगळवारी रात्री 12 वाजताच महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सबस्टेशनमध्ये जाऊन कार्यरत कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. पुढील तीन दिवस कोणत्याही कामात सहभाग घेतला जाणार नाही. असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संपाचा विचार करता वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कंपनीने तयारी केली आहे. 24 तास नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. कंपनी संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे. कर्मचान्यांच्या सुट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. एजन्सी तसेच कंत्राटी कर्मचारी, सेवानिवृत्त अभियंता, सार्वजनिक बांधकाम, विद्युत निरीक्षक आणि महाऊर्जाच्या अभियंत्यांना सब स्टेशनमध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. संपाला पाठिंबा देणाऱ्या एजन्सींना तत्काळ बडतर्फ करण्याचा इशारा दिला आहे.


ऊर्जामंत्री कामगार संघटनांशी चर्चा करणार


उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी एक वाजता मुंबई येथे कामगार संघटनांसोबत चर्चा करणार आहेत. वीज कंपन्यांनी संघटनांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.


ही बातमी देखील वाचा...


Indian Science Congress चा पहिलाच दिवस गैरव्यवस्थापनाचा; संशोधकांसह आगंतुकांना फटका