नागपूर: नरेंद्र जिचकर (Narendra Jichkar) यांच्यावर अन्याय झाला आहे आणि अन्यायाविरोधात लढलंच पाहिजे, आम्ही अन्यायाविरोधात लढू आणि जिंकू असं वक्तव्य काँग्रेसचे नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांनी केलं आहे. नरेंद्र जिचकारांच्या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी होत सुनील केदार यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. नरेंद्र जिचकर यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे.


नरेंद्र जिचकर यांनी आपल्या यात्रेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली. त्यांना आता सुनील केदार यांनी पाठिंबा दिला आहे. सुनील केदार यांच्या या वक्तव्यानंतर मात्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय. काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि सुनील केदार असे दोन गट निर्माण झाल्याची चर्चादेखील आहे.  


काय म्हणाले सुनील केदार? 


नरेंद्र जिचकर यांच्या जनआशिर्वाद यात्रेत सुनील केदार यांनी उपस्थिती लावली. ते म्हणाले की,  नरेंद्र जिचकार यांच्यावर अन्याय झाला आहे, अन्यायाविरोधात लढलंच पाहिजे. माझ्या भूमिकेतून मी ते स्पष्ट केलेच आहे. आम्ही अन्यायाविरोधात लढू आणि जिंकू.


विशेष म्हणजे काँग्रेसच्या सभेत नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्याशी वाद झाल्यानंतर नरेंद्र जिचकर यांना काँग्रेसच्या अनुशासन समितीने आधी कारणे दाखवा नोटीस जारी केले होते. नंतर त्यांची काँग्रेस मधून सहा वर्षासाठी हकालपट्टी केली होती. माझ्यावर अन्याय झाला आहे, विकास ठाकरे यांच्या विरोधात मी आवाज उचलला, म्हणून प्रदेश नेतृत्वाने मला पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवल्याचा आरोप करत नरेंद्र जिचकर यांनी सोमवारपासून एक महिन्यासाठी नागपुरात आपली जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. 


काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदावर बसलेले लोक काँग्रेसच्या हितासाठी नाही, तर भाजपच्या हितासाठी काम करतात असेही ते 'एबीपी माझा'शी बोलताना म्हणाले होते. आता त्याच निष्काशित नेत्याच्या जनआशीर्वाद यात्रेत सुनील केदार यांच्यासारखा मतब्बत काँग्रेस नेता सहभागी झाल्यामुळे नागपुरात काँग्रेसचा हा अंतर्गत वाद आणखी वाढत जाईल अशी चिन्हे आहेत.


देशात एकीकडे काँग्रेसचे खासदार आणि नेते राहुल गांधी यांनी न्याय यात्रा सुरू केली असताना राज्यातील नागपूर काँग्रेसमध्ये मात्र काहीसा वाद असल्याचं चित्र आहे. 


ही बातमी वाचा: