Nagpur News : येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामात शेतकरी हरभरा आणि गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी करत असतात. याकरता केंद्र आणि राज्य शासनामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि कृषी उन्नती योजनेंतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दोन्ही योजनेत शेतकऱ्यांना हरभरा आणि गहू प्रमाणित बियाणे अनुदानावर मिळणार आहे. हरभरा व गहू बियाणे महाबीज विक्रेत्याकडे उपलब्ध राहणार आहेत.
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी अनुदानित दराने बियाणे प्राप्त करुन घेण्याकरीता नजिकच्या कृषी कार्यालय तसेच महाबीज कार्यालयात संपर्क साधावा. अनुदानावर कमी दरात महाबीजचे हरभरा व गहू प्रमाणित बियाणे उपलब्ध असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाबीजचे विभागीय व्यवस्थापक विनोद पाटील यांनी केले आहे.
प्रति क्विटल अनुदान व अनुदानित विक्री दर
10 वर्षाआतील हरभरा वाणासाठी प्रती क्विंटल अनुदान 2 हजार 500 रुपये राहणार असून अनुदानित विक्री दर 4 हजार 500 रुपये आहे. 10 वर्षावरील हरभरा वाणासाठी प्रती क्विंटल अनुदान -2 हजार रुपये राहणार असून अनुदानित विक्री दर 5 हजार राहणार आहे. 10 वर्षाआतील हरभरा काबुली वाणासाठी अनुदान- 2 हजार 500 राहणार असून अनुदानित विक्री दर 8 हजार 500 रुपये आहे. 10 वर्षावरील हरभरा काबुली वाणासाठी प्रती क्विंटल अनुदान- 2 हजार राहणार असून अनुदानित विक्री दर - 9 हजार रुपये आहे. 10 वर्षाआतील गव्हाचा वाणासाठी प्रती क्विंटल अनुदान 1 हजार 500 असून अनुदानित विकी दर - 2 हजार 500 रुपये तर 10 वर्षावरील गव्हाचा प्रती क्विंटल अनुदान 1 हजार 500 असून अनुदानित विक्री दर 2 हजार 700 रुपये आहेत. या प्रकारे हरभरा व गहू बियाण्यांकरिता प्रती क्विंटल अनुदान व अनुदानित विक्री दर असणार आहेत.
परतीचा पाऊस काढतोय शेतकऱ्यांचे दिवाळे
जिल्ह्यात आणि तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पिक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांची ही दिवाळी अंधकारमय झाली आहे. अशा स्थितीत शेतकरी आता शासनाकडून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांच्या हातून उभे पीक गेले तर दुसरीकडे शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकरी हताश झाला असल्याचे चित्र आहे.
महत्त्वाची बातमी