Nagpur News : राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) कोसळल्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या (Nagpur ZP) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रभाव पडेल, असे बोलले जात होते. राज्यातील सत्तांतरानंतर भाजपनेही कॉंग्रेसमधील नाराजांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. तसेच कॉंग्रेसचे एक बंडखोर नेते काही काळासाठी 'नॉट रिचेबल'ही होते. त्यांनी काही माध्यमांसमोर आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखविली होती. मात्र या तीन दिवसांच्या नाट्यमय घडामोडींवर अखेर सोमवारी ब्रेक' लागला. पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणूकीत नागपूर जिल्हा परिषदेवर (ZP) कॉंग्रेसचे माजी मंत्री आमदार सुनील केदार गटाचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. 


सुनील केदार यांच्या अभेद्य व्यूहरचनेमुळे अध्यक्षपदी पाटनसावंगी सर्कलच्या मुक्ता कोक्कड्डे तर उपाध्यक्षपदी गोधनी सर्कलच्या कुंदा राऊत यांची निवड करण्यात आली. राज्यातील सत्तांतरानंतर जिल्हा परिषदेतही सत्तांतर होईल अशा अंदाज जिल्हा परिषद वर्तुळात वर्तविण्यात येत होता. मात्र कॉंग्रेस नेते माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणावर आपली पकड अजूनही मजबूत असल्याचे या निकालातून सिद्ध केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान मागील तीन दिवस नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामुळे दरम्यान पक्षांतर्गत धाकधूक वाढली होती. 


अंतर्गत कलहामुळे वाढली होती धाकधूक


मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाला अंतर्गत कलहाचा सामना करावा लागला असता विरोधी पक्षाने सुध्दा आपली व्यूहरचना रचली. निवडणूक रिंगणात तरबेज असणारे सुनील केदार यांना मात्र मात देता आली नाही. काँग्रेस पक्षाच्या मुक्ता कोक्कड्डे यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकित 39 विरुद्ध 18 मतांनी विजय संपादन केला. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कुंदा राऊत यांनी 38 विरुद्ध 19 मतांनी विजय संपादित केला.


ही परिवर्तनाची नांदीः केदार


हा निवडणुकीचा निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे. भविष्यात सुद्धा अश्याच निकालाची अपेक्षा आहे. हा विजय म्हणजे महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाची पावती होय. यानंतर सुद्धा ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाकरिता तत्पर राहणार असल्याचे मंत्री सुनील केदार यांनी यावेळी सांगितले.


इतर महत्त्वाची बातमी


Nagpur Gram Panchayat Results : उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात कुणाचा डंका? कॉंग्रेस-भाजपचे प्रत्येकी सहा ग्रामपंचायतींवर सरपंच