नवी दिल्ली : गेल्या साडेतीनशे वर्षांपासून महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च अभिमानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करणारं एक पुस्तक दिल्ली भाजपच्या कार्यालयात नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे या पुस्तकाचं नाव आहे.


दिल्ली भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. काल (12 जानेवारी) भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दिल्लीमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर एका धार्मिक सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.


या पुस्तकाद्वारे मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्यात आल्याने त्याबद्दल राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही तुलना न पटणारी आहे, अशा पद्धतीचे ट्विट केले आहे. 'जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही. असेही त्यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनीही अशा पद्धतीने तुलना करपन भाजपने छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याची टीका केली आहे.


महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. ही तुलना करणे हे बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. या प्रवृत्तीचा निषेध करतो, असं सातव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.