भोपाळ : मध्य प्रदेशातल्या छिंदवाडामध्ये अतिक्रमण हटाव मोहीमेत ज्या चुकीच्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला होता. त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींकडून रोष व्यक्त होत होता. या प्रकरणी महाराष्ट्रातले काँग्रेस नेते राजीव सातव, मंत्री सुनील केदार यांनी तातडीनं हा विषय कमलनाथ यांच्या कानावर घातल्यानं आता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणाहून हा पुतळा हटवण्यात आला होता, तिथेच योग्य जागेवर शिवरायांच्या पुतळ्याची पुन्हा विधीवत स्थापन होणार असून त्या स्मारकाच्या शीलान्यासासाठी स्वत: मुख्यमंत्री कमलनाथ हजर राहणार आहेत.


अतिक्रमणाच्या दरम्यान कारवाई करताना अधिकाऱ्यांनी किमान महापुरुषांच्या सन्मानाला तडा जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी होती, त्यामुळे याबाबत अधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबतही चौकशी होणार असल्याचं मंत्री सुनील केदार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. छिंदवाडा जिल्ह्यातल्या सौसरमध्ये 11 फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास ही अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यात जेसीबीच्या साहाय्यांना महाराजांचा पुतळा हटवण्यात आला होता. या कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरु लागल्यानंतर त्याबद्दल महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होत होता. भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही याबाबत काँग्रेसवर टीका केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांवर लवकरच हॉलिवूडपट, भारत सरकार आणि मार्टिनी फिल्म्स करणार निर्मिती

खासदार संभाजीराजे यांची टीका -
मध्यप्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जेसीबी लावून हटवल्याने खासदार छत्रपती संभाजीराजे काँग्रेस सरकारवर प्रचंड संतापले आहेत. शिवरायांची मूर्ती हटवल्याने जनआक्रोश वाढला आहे. त्याची झळ सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिलाय. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विट करून हा इशारा दिलाय. ते म्हणतात, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं. मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकारने व पक्षाच्या अध्यक्षांनी याचा त्वरित खुलासा करावा. मूर्ती काढावीच लागणार होती, तर त्याची पद्धत सन्मानजनक ही करता आली असती. असल्या क्रूर पद्धतीने हटवून तुम्ही नेमकं काय सिद्ध करू पाहत आहात? असे कृत्य छत्रपतींचा वंशज म्हणून कदापीही सहन करु शकत नाही. या ट्विटमध्ये त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसच्या ट्विटर हँडलला ट्विट केलं आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांवर लवकरच हॉलिवूडपट | ABP Majha