नागपूर: महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठाने 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर केला. आश्चर्यकारक बाब म्हणजे आरोपीला जामीन देताना उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांनी म्हटलं की, हा बलात्कार नसून दोघांमधील प्रेमसंबंध आहे, लैंगिक संबंध वासनेतून नव्हते तर आकर्षणातून होते. आरोपीला जामीन दिल्यानंतर न्यायमूर्तींनी केलेल्या टिप्पणीवरून वाद सुरू झाला आहे. आरोपीला जामीन देण्याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
न्यायमूर्तींनी सांगितले की, मुलीने तिच्या निवेदनात म्हटले आहे की, तिने स्वेच्छेने घर सोडले आहे. ती आरोपीसोबत राहिली, जो 26 वर्षांचा आहे. दोघांनीही त्यांचे प्रेमप्रकरण मान्य केले आहे. यावरून असं दिसते की लैंगिक संबंधाची कथित घटना दोन तरुणांमधील आकर्षणाबाहेर होती आणि तरूणाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले असे नाही.
तरुणाचे वय 26 वर्षे
पीडितेच्या वडिलांनी ऑगस्ट 2020 मध्ये त्यांची 13 वर्षांची मुलगी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी मुलीचा माग काढण्यास सुरुवात केली. या अल्पवयीन तरूणीचे एका 26 वर्षीय तरूणावर प्रेम होतं. नितीन ढाबेराव असं त्याचं नाव असून त्याच्यावर प्रेम असल्याचे तरुणीने सांगितले. त्या तरूणासोबतच राहायचं असल्याचं त्या मुलीने सांगितलं, पण मुलगी केवळ 13 वर्षांची होती. त्यामुळे पोलिसांनी नितीनला अटक केली. पोलिसांना मुलीला ताब्यात घेऊन तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
या कलमान्वये गुन्हा दाखल
पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नितीन विरुद्ध आयपीसीच्या कलम 363,376,376 (2) (एन) 376 (3) तसेच कलम 34 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4,6 आणि 17 नुसार गुन्हा दाखल केला. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलिसांनी 30 ऑगस्ट 2020 रोजी अर्जदाराला अटक करून कारागृहात पाठवले. 26 ऑक्टोबर 2020 रोजी त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.
मुलीने मुलाच्या बाजूने निवेदन दिले
त्या तरूणीचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध असून, त्याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावली नसल्याचे तरुणीने आपल्या जबाबात म्हटलं आहे. या खटल्यात कोणतीही प्रगती झालेली नाही आणि 13 वर्षांच्या मुलीच्या संमतीने काही फरक पडत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तपास अधिकाऱ्याने नोंदवलेल्या जबाबावरून ते घरातून स्वेच्छेने निघून गेल्याचं स्पष्ट होतंय असं न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की, कथित घटना बळजबरीने केलेल्या अत्याचाराच्या प्रकरणापेक्षा दोन तरुणांमधील सहमतीच्या संबंधाचा परिणाम असल्याचे दिसून आले. अटक झाल्यापासून आरोपीने जवळपास 3 वर्षे तुरुंगात घालवली, जी न्यायालयाने आरोपीला जामीन देतानाही विचारात घेतली.
ही बातमी वाचा: