मुंबई : नागपूर इथे होणाऱ्या 99 व्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची निवड झाली आहे. याबाबत उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित  99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2019 या कालावधीत नागपूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे संपन्न होणार आहे.


प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. नागपूरकरांच्या आग्रहास्तव एलकुंचवार यांनी आयोजकांचे उद्घाटक म्हणून निमंत्रण स्वीकारले आहे. यानिमित्ताने अध्यक्ष आणि उद्घाटक विदर्भाचेच असल्याचा योग जुळून आला आहे आणि नाट्य संमेलन देखील नागपूर येथेच होणार असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

22 फेब्रुवारीपासून हे चार दिवसीय संमेलन रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. 33 वर्षांनंतर नागपूरला नाट्यसंमेलनाचे यजमानपद मिळाले आहे.  एलकुंचवार यांनी या नाट्य संमेलनाचे उद्घाटन करावे, अशी सर्व रंगकर्मींची इच्छा होती.

एलकुंचवार यांना आम्ही तशी विनंती केली. ती त्यांनी मान्य केली आहे. केवळ विदर्भ-महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील नाट्यकर्मींच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना आहे. दिल्लीपासून ते कोलकात्यापर्यंत एलकुंचवार यांचा चाहता वर्ग आहे. त्यांनी उद्घाटक होण्याचे मान्य केल्याने त्यांच्या देशातील समस्त चाहत्यांना आनंद झाला आहे, अशी माहिती नाट्य परिषदेने दिली आहे.