अकोला/नागपूर/अमरावती : शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्यांची नग्न धिंड का काढू नये? हा उद्वेगजनक सवाल विचारला आहे सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका अरुणा सबाने यांनी. अरुण सबाने यांनी प्रश्नी विचारण्यासाठी लिहिलेला लेख सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांनी लिहिलेल्या या लेखाचा रोख अकोल्याच्या मूर्तिजापूरमधल्या संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे आहे. त्याच महाविद्यालयातील एका सहाय्यक प्राध्यापिकेने प्राचार्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यामुळे ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.    


या प्राचार्यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात ते आपल्याच महाविद्यालयातील शिक्षकांसोबत अर्वाच्च आणि अश्लील भाषेत बोलताना दिसत आहेत. मूर्तिजापूरच्या संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे विद्यापीठ राजकारणात बरेच सक्रिय आहेत. या महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिकेने प्राचार्यांवर शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानंतर काही पुरुष प्राध्यापिकेच्या समर्थानात प्राचार्यांना भेटायला गेले असता त्यांनी अश्लील भाषा वापरली


प्राध्यापिकेच्या आरोपानुसार, "डॉ. संतोष ठाकरे यांनी लिफ्टच्या बहाण्याने स्वतःच्या गाडीत बसवलं आणि अमरावती मूर्तिजापूर प्रवासात त्यांनी आधी स्वतःच्या पत्नीविषयी खोट्या कहाण्या सांगून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. प्राध्यापिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्यावर प्राचार्यांनी त्यांच्याशी अश्लील बोलणं सुरु केलं आणि त्यांनी सरळ शरीरसुखाची मागणी केली. त्यांना दाद न देता सरळ गाडी थांबायला लावून त्या गाडीतून उतरल्या. त्याचा वचपा म्हणून कॉलेजमध्ये सर्वांसमोर त्यांचा अपमान करणे, त्यांना टोमणे मारणे, त्यांना आणि मुलींना कॉलेजमध्ये उशिरापर्यंत थांबवून ठेवणे, अश्लील भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे, आई-बहिणीच्या, कमरेखालच्या शिव्या देणे, त्यांचे सर्व्हिस बुक गहाळ करणे, त्यांचे एचआरए कपात करणे अशा विविध पद्धतीने त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. वारंवार प्राध्यापिकाच नव्हे तर अन्य मुलींनाही स्वतःच्या फ्लॅटवर बोलावणं. असे प्रकार प्राचार्य ठाकरे सतत करत होते.      


याबाबत लेख लिहिणाऱ्या अरुणा सबाने यांच्या माहितीनुसार, "मी काही एकदम हा लेख लिहिला नाही. मला प्राध्यापिकेने सर्व प्रकार महिना दीड महिन्याआधी सांगितला होता. मी त्यानंतर बऱ्याच लोकांशी बोलले. त्या प्राचार्यांशीही बोलले. इतर प्राध्यापक, विद्यार्थ्यांशीही बोलले, त्यानंतर हा लेख लिहिला आहे. संस्थेच्या अध्यक्षांशी बोलले पण त्यांचे म्हणणे आहे की असे काही नाही. प्राचार्यांशी बोलले, ते माझ्याशी जसे बोलले त्यावरुन मला ते अत्यंत कुटुंबवत्सल वाटले. पण मी बऱ्याच लोकांशी बोलले आणि मला लक्षात आले की ते अत्यंत वाईट वाईट वृत्तीचे आहेत. नक्कीच कोणा मोठ्यांचा पाठिंबा आहे? मॅनेजमेंट काही का करत नाही? कॉलेज कसे पाहिजे? आपण महाविद्यालय म्हणजे कसं समजतो? आता महिलांचे शोषण हे सर्वच ठिकाणी होताना दिसते आहे पण महाविद्यालय? आणि तेही प्राचार्य?         


प्राध्यापिकेने मूर्तिजापूर पोलीस स्टेशनमध्ये प्राचार्याविरुद्ध शरीरसुखाची मागणी करणे, शारीरिक, मानसिक त्रास देणे याबाबत तक्रार केली. पण संबंधितांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांनी मॅनेजमेंटकडे, भय्यासाहेब तिडके यांच्याकडे सुद्धा तक्रार केली; पण त्यांना कुठेच दाद मिळाली नाही असं त्यांचं म्हणणे आहे. एबीपी माझानेही भय्यासाहेब तिडके यांच्याशी फोनवर संपर्क केला. हे दोन गटातील राजकारण असून यात काही तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र यावर कुठलंही अधिकृत वक्तव्य करायला ते तयार नाहीत.


दुसरीकडे प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांनी सुद्धा प्राध्यापिकेविरोधात माफीनाम्याचे बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात उलट तक्रार दाखल केली आहे. अंतर्गत चौकशीवर प्राध्यापिकेने अविश्वास दर्शवला असला तरी डॉ. संतोष ठाकरे हे सुद्धा आपल्याविरोधात आरोपपत्र दाखल होऊ नये यासाठी कोर्टात गेले आहेत. कोर्टाने 15 फेब्रुवारी 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार अंतर्गत चौकशी सुरु असून पुढेही तपास सुरु ठेवू शकता, असं म्हणत पोलिसांना मात्र कोर्टाच्या परवानगीशिवाय डॉ. ठाकरेंवर आरोपपत्र दाखल करु नये असं सांगितलं आहे. 


एकीकडे आरोप-प्रत्यारोप असताना कोणाचं खरं, कोणाचं खोटं हा फक्त एक भाग झाला, पण दुसरा भाग दुर्लक्ष करुन चालणार नाही तो म्हणजे हे व्हिडीओ. एका प्राचार्याच्या भाषेचा. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय हे काही शाश्वत मूल्यांचा शोध आणि बोध घेता यावा, सद्गुण घेता यावे, आदर्श मानता यावे अशा व्यक्तींची भेट होण्याचे स्थान. इथे भाषा आणि वागणूक कशी हवी? त्यापेक्षा ती कशी नसावी, अगदीच नसावी याचं उदहारण म्हणजे हे व्हिडीओ आहेत. त्यामुळे आतापर्यंत काहीच कारवाई न करणाऱ्या महाविद्यालयाने फॉरेन्सिक तपास करुन दूध का दूध , पानी का पानी करणे गरजेचं आहे.