नागपूर : माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक राम खांडेकर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. काल रात्री नागपुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 87 वर्षांचे होते. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नरसिंहराव यांच्यासोबत 1985 ते त्यांच्या निधनापर्यंत राम खांडेकर यांनी काम केलं. तर यशवंतराव चव्हाण आणि नरसिंहराव यांचे खाजगी सचिव म्हणून तब्बल चार तपांची शासकीय सेवेतील कारकिर्द राम खांडेकर यांनी व्यतित केली. 


दोन दिग्गज नेत्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारे राम खांडेकर हे अत्यंत सुसंस्कृत आणि सज्जन व्यक्तिमत्त्व होतं. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नागपूरमधील त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राजकारणात असताना नेत्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणं पीए किंवा स्वीय सहाय्यक मिळणं हा अत्यंत दुर्लभ योग असतो. राम खांडेकर यांच्याबाबतीत मात्र अत्यंत विद्वान आणि साहित्याशी संबंध असलेल्या नेत्यांशी त्यांचा संबंध आलेला होता. 


पाहा व्हिडीओ : Ram Khandekar : पीव्ही नरसिंहराव, यशवंतराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक राम खांडेकर कालवश



पंतप्रधान कार्यालयातील नरसिंहरावांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी राम खांडेकरांची ओळख होती. या सर्व अनुभवांवर त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. त्यांच्या शासकीय सेवेतील अनुभव त्यांनी पुस्तकाच्या स्वरुपात मांडले. 2019 साली 'सत्तेच्या पडछायेत' हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्याचप्रमाणे खांडेकर यांनी महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खाजगी सचिन म्हणून देखील काम पाहिलं होतं. राजकारणाबरोबरच खांडेकर यांनी वृत्तपत्र व दिवाळी अंकांसाठी लेखन केलं आहे.