Nagpur Crime news : अॅपल कंपनीच्या (Apple company) नावाने बनावट वस्तूंची विक्री करणाऱ्या चार मोबाईल दुकानांवर पोलिसांनी (Police) धाडी टाकल्या आहेत. ही कारवाई नागपूरमधील (Nagpur) सीताबर्डी परिसरात करण्यात आली आहे. तर गिट्टीखदान परिसरातील एका दुकानावरही कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी तब्बल 98 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


अॅपल कंपनीचे मोबाईल, चार्जर, ॲडाप्टर, यु एस बी केबलचे बनावटीकरण


बनावट इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणाऱ्या चार मोबाईल शॉपवर नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या पथकाने  धाड टाकली आहे. यामध्ये 88 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. सीताबर्डी परिसरातील बाजारात मोदी नंबर तीन येथील काही दुकानदार अॅपल कंपनीचे मोबाईल, चार्जर, ॲडाप्टर, यु एस बी केबल, एअर पॉड, मॅकबुक, आयपॅड मोबाईल कव्हर इत्यादींचे बनावटीकरण करुन होलसेल आणि किरकोळ स्वरुपात विक्री सुरु आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी अॅपल कंपनीला सूचना दिली. त्यानंतर अॅपल कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन चार दुकानांवर धाड टाकून 88 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाई करण्यात आलेल्या चारही दुकानात नामांकित कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनाची हुबेहुब नक्कल करुन सारखी रंगसंगती असलेल्या वस्तू तयार केल्या जात होत्या.  स्वामित्व हक्कांचा कायदेशीर अधिकार नसतानाही 88 लाख रुपये किंमतीच्या वस्तूंचे बनावटीकरण आणि साठेबाजी करण्यात आली होती.


सोशल मीडियाच्या माध्यमातून अॅपल कंपनीच्या बनावट वस्तूंची विक्री


दुसऱ्या कारवाईत इन्स्टाग्रामसह सोशल मीडियाच्या माध्यमातून अॅपल कंपनीच्या बनावट वस्तूंची विक्री सुरु असल्याची गोपनीय माहिती सायबर सेलला  मिळाली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी गिट्टीखदान परिसरात धाड टाकून 10 लाख रुपये किमतीच्या बनावट वस्तू जप्त केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे सर्व वस्तू बनावट असताना देखील शेकडो ग्राहक या वस्तू घेण्यासाठी गर्दी करत होते. सायबर पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Apple iPhone 15 ची तारीख ठरली; ॲपलकडून 'या' दिवशी नवे गॅजेट्स बाजारात येणार