नागपूर: नागपुरात गुन्हेगारी सत्र वाढत आहे. नागपूर (Nagpur) ग्रामीण पोलिसांना जिओ मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळालं आहे. या टोळीकडून 82 बॅटरीज जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सध्या बाजारात 26 लाख एवढी आहे. या टोळीतील पाच सदस्यांना अटक करण्यात आली असून यातील एक दिल्लीचा राहणारा आहे.


कशा प्रकारे सुरू होती मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी?


चोरटे नेमकं काय चोरतील याचा नेम राहिलेला नाही. नागपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ज्या आंतरराज्यीय टोळीला अटक केली त्यांनी देखील अशीच काहीशी नामी शक्कल लढवली होती. ही टोळी ज्या ठिकाणी जिओचे मोबाईल टॉवर लागले आहेत, त्या ठिकाणी आधी रेकी करायची आणि मग त्या ठिकाणी जाऊन त्या टॉवरमधील बॅटरीची चोरी करायची. प्रत्येक जिओ टॉवरला या बॅटरी लागलेल्या असतात आणि या एका बॅटरीची किंमत जवळपास 80 ते 90 हजारांच्या घरात असते, अशा एकूण 82 बॅटरी या टोळीने चोरल्याचं तपासात उघड झालं आहे, या चोरलेल्या एकूण बॅटरीची किंमत 26 ते 27 लाखांच्या घरात आहे.


पोलिसांकडून अधिक तपास सुरू


चोरांच्या या टोळीने नागपूर ग्रामीण भागात अक्षरश: हैदोस माजवला होता. मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या या टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असून यातील एक आरोपी हा दिल्लीचा राहणारा आहे, मग त्याचं या गँगशी काय कनेक्शन आहे? ही गँग बाहेरून येऊन अशा प्रकारे चोरी करते का? त्याचप्रमाणे, अशा प्रकारे टॉवरच्या बॅटरी चोरीमध्ये त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग आहे का? या सगळ्या बाबींचा शोध आता पोलीस घेत आहेत.


चोरांच्या टोळीमागे मोठं रॅकेट कार्यरत?


नागपुरात या चोरांची दहशत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने ग्रामीण पोलिसांनी त्यांच्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. मात्र ही टोळी हाती लागत नव्हती, पण आता ही टोळी पोलिसांच्या हाती लागल्याने एक मोठं रॅकेट बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


नागपुरात चाललंय करी काय?


नागपुरात चोरीच्या घटनांसह हत्येच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. उपराजधानी नागपुरात 20 ऑगस्टला 24 तासांत चार वेगवेगळ्या घटनेत तिघांची हत्या झाली असून जीवघेण्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले, त्यामुळे नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


सविस्तर वाचा:


Nagpur Crime: नागपुरात कायदा-सुव्यवस्था ढासळली; 24 तासांत तिघांची हत्या, दोन जखमी