नागपूर : नागपूर पोलिसांनी 11 ऑगस्ट रोजी गंगा जमुना वस्ती चारही बाजूने बॅरिकेट्स लावून सील केली होती. सकाळी विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या ज्वाला जांबुवंतराव धोटे अचानक गंगा जमुना बस्ती पोहोचल्या आणि त्यांनी आंदोलन सुरू केले.


या वस्तीत अल्पवयीन मुलींकडून बेकायदेशीररित्या देहव्यापार करून घेतला जातो, तसेच वस्तीतून काही गुन्हेगार आणि असामाजिक तत्त्व अंमली पदार्थांचा व्यापार चालवतात, वस्तीतून गुन्हेगारीला चालना दिली जाते असं कारण पोलिसांकडून गंगा जमुना बस्ती सील करताना देण्यात आलं होतं. 


सुरुवातीला ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने सुरू झाले होते. पोलिसांनी ही वस्ती सील करून मोठी जागा धनदांडग्यांच्या घशात टाकण्याचा डाव रचल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र थोड्या वेळा नंतर शांततेने सुरू असलेले आंदोलन अचानक हिंसक झाले आणि ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात वारांगणानी पोलिसांनी लावलेले सर्व बॅरिकॅडींग तोडून फेकले.


ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात शेकडो वारांगणाचा मोर्चा संपूर्ण गंगा जमुना वस्तीत फिरला आणि पोलिसांकडून लावण्यात आलेल्या सर्व बॅरिकॅडींग काढून वस्ती पुन्हा खुली करण्यात आली.


सकाळपासूनच आंदोलनाची चाहूल लागल्यामुळे पोलिसांनी मोठा फौजफाटा बंदोबस्तात लावला होता. मात्र तरीही वरांगणांच्या आंदोलनापुढे पोलिसांचा बंदोबस्त कमकुवत ठरला. पोलीस आता यावर पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.


महत्वाच्या बातम्या :