मोहन भागवत तुम्ही चुकीचा खेळ सुरु केला, पण शेवट मी करणार : प्रकाश आंबेडकर
संघवाले शस्त्र बाळगतात. मोहन भागवत एके-47 ची पूजा करतात, त्यांच्यावर नागपूर पोलीस कारवाई करत नाहीत. त्यामुळे पोलिसही भविष्यात सहआरोपी होतील, असा हल्लाबोल आंबेडकरांनी केला.
नागपूर : राष्ट्रीय स्वयं संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भागवत तुम्ही चुकीचा खेळ सुरु केला आहे आणि या खेळाचा शेवट मीच करणार, असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिला.
प्रकाश आंबेडकर नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते. मोहन भागवतांनी एका खोट्या पत्राच्या आधारे आम्हाला पंतप्रधानांच्या हत्येच्या तथाकथित कटात अडकवण्याचा डाव रचला. मात्र, पुढील तीन महिन्यात आम्ही तुम्हाला लोकसभा निवडणुकीत दोन अंकी संख्येवर आणल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर भागवतांना नागपूरच्या जेलमध्ये टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला.
संघवाले शस्त्र बाळगतात. मोहन भागवत एके-47 ची पूजा करतात, त्यांच्यावर नागपूर पोलीस कारवाई करत नाहीत. त्यामुळे पोलिसही भविष्यात सहआरोपी होतील, असा हल्लाबोल आंबेडकरांनी केला.
महाआघाडीमध्ये सहभागी होण्याबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले की, आम्ही एमआयएमची साथ सोडणार नाही. जर काँग्रेसला युती हवी असेल तर त्यांनी एमआयएमला ही स्वीकारावे.
यावेळी एमआयएमचे आमदार वारिस पठाण उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा फुसकी बॉम्ब निघाला. ट्रेन भरून भरून शिवसैनिकांना अयोध्येत नेले. लाखोंचा खर्च करुन काहीच नाही केले, असं वारीस पठाण म्हणाले. राज ठाकरे यांना छोटे ठाकरे संबोधत वारिस पठाण यांनी राज यांना विझलेला दिवा असल्याची टीका केली.