नागपूर : निमलष्करी दलाच्या भरती प्रक्रियेला तीन वर्षे लोटूनही नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांनी अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मागील 32 दिवसांपासून नागपूरच्या संविधान चौकात त्यांचं आंदोलन सुरु आहे. तापमानाचा पारा उच्चांक गाठत असताना रोज उपोषणाला बसलेल्या दोन ते तीन आंदोलकांची प्रकृती गंभीर होत आहे. पण कुंभकर्ण झोपेत असलेलं प्रशासन मात्र कुठलीच दखल घ्यायला तयार नाही. दुसरीकडे आंदोलनात सहभागी झालेले सर्व तरुणही नोकरी नसल्याने घरात बसण्यापेक्षा नागपूरच्या संविधान चौकात आमरण उपोषणाला बसून जीव गेला तरी चालेल असा निश्चय करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत आमचा लढा सुरु राहिल असा पवित्रा त्यांनी घेतला.


नोकरी मिळावी म्हणून अनेक जण कितीतरी वर्ष परिश्रम घेऊन शारीरिक मानसिक तयारी करतात. पण जेव्हा हातातोंडाशी आलेला घास हिसकावला जातो तेव्हा संघर्षापलीकडे काहीच शिल्लक राहत नाही. यातच वयोमर्यादा संपल्याने सरकारी नोकरीचे दार बंद झाल्याने हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा आमरण उपोषण करत मागणी रेटून धरत आहेत. नागपूरच्या संविधान चौकात 40 तरुणांपासून सुरु झालेल्या आंदोलनात आज जवळपास 80 जण सहभागी होऊन 5 हजार 210 मुलांचे नेतृत्व करत आहे. 


स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जुलै 2018 मध्ये 60 हजार 2010 जागा निमलष्करी दल परीक्षेसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली. यात 11 फेब्रुवारी ते 25 मार्च 2019 या कालावधीत लेखी परीक्षा झाली. तर 21 जून 2019 रोजी निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांना पास झाल्याचं कळताच आयुष्य सार्थकी झाल्याचा निश्वास त्यांनी सोडला. रोज पहाटे उठून शाररिक तपासणीला समोर जाण्यासाठी कितीतरी वर्ष परीश्रम घेतले. ती परीक्षा 13 ऑगस्ट 25 सप्टेंबर 2019 दरम्यान पार पडली. या महत्त्वाच्या टप्प्यानंतर अंतिम टप्पा म्हणजे वैदकीय तपासणी 9 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2022 पार पडली. आता निकाल जाहीर होऊन नोकरीचे नियुक्ती पत्र मिळणे एवढेच बाकी असतांना मात्र निकाल जाहीर होताच निराशा झाली. 60 हजार 210 जागेसाठी झालेल्या भरती प्रक्रियेत लाखो विद्यार्थ्यांमधून 5 हजार 210 विद्यार्थी यांना बाजूला करत 55 हजार विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात आलं. त्यामुळे सर्व अग्निपरीक्षा पास करुन नोकरीची संधी हुकल्याने अखेर आंदोलन सुरु ठेवलं आहे.


नागपुरात सध्याच्या घडीला तापमानाचा पारा चाळिशी पार गेला आहे. या परिस्थितीत अंगाची लाही लाही होत असताना वर्षोनुवर्षे परिश्रम घेऊन नोकरीची संधी दार ठोठावत नाही, तेच दार उघडण्यापूर्वीच संधी परत निघून गेली. कारण स्टाफ सिलेक्शन कमिशनने जाहीर केलेल्या 60 हजार 210 जागा न भरता 55 हजार जागा भरत प्रक्रिया थांबवली. एकीकडे हजारो जागा खाली असताना नोकरी प्रकियेत सामावून न घेत असल्याने कडक उन्हाचा मारा सहन करत या तरुणांनी घरदार सोडून महिन्याभरापासून उपराजधानी नागपुरात तळ ठोकला आहे. इथेच राहून गरज पडल्यास प्रशासनाने ऐकत नसल्याने इथेच मरण्याच्या निश्चयाने आंदोलनात सहभगी झाले आहेत. यात 11 जणांनी उपोषण सुरु करत चाळीस जण मंडपात बसून होते. पण ही संख्या वाढून 80 जण उपोषणात सहभागी झाले आहेत.


'वर्दी द्या नाही तर अर्थी न्या'
दिल्लीत अनेक महिने आंदोलन करुन काहीच मार्ग निघाला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही भेटून न्याय देण्याची मागणी केली. पण अखेर पोलिसांनी दडशाही करत आंदोलन दाबल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. यात आता हे आंदोलन उपराजधानी नागपुरात सुरु होऊ 32 दिवस झाले असताना भरती प्रक्रियेत सामावून घेतलं जात नसल्याने एक तर वर्दी द्या नाही तर आमची अर्थी (मृतदेह) न्या असा निश्चय करुन सर्व विद्यार्थी आंदोलनाला बसल्याचं नांदेड इथल्या निलेश मोरे यांनी सांगितलं. त्यामुळे आता काहीही झाले तर मागे हटणार नाही म्हणत आंदोलन सुरुच राहणार असे सांगितलं.


प्रकृती बिघडल्याने 30 ते 35 जण दवाखान्यात, डिस्चार्ज मिळताच पुन्हा उपोषण सुरु
फेब्रुवारी महिन्यात नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन सुरु झाले. 4 मार्चपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणादरम्यान प्रकृती बिघडल्याने आतापर्यंत साधारण 30 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यात 10 मुलींचाही समावेश आहे. त्यामुळे आता मागे हटणार नाही म्हणत दवाखान्यातून सुटताना पुन्हा उपोषणाला बसून संघर्ष सुरु ठेवणार असल्याचं हे विद्यार्थी सांगतात. पुढच्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.