Nagpur Municipal Corporation News: एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून नागपूरचा उल्लेख केला जात आहे. तर दुसरीकडे नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यातही नागपूर महानगरपालिका अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांसाठी मनपा मुख्यालयात तक्रार पेटीही नाही, तरीही सोशल मीडियावर किंवा ऑनलाईन तक्रार करा असा सल्ला देण्यात येतो. मात्र सोशल मीडियावरही (Social Media) 'खास' तक्रारी सोडवून त्याची मार्केटिंग केली जाते. मात्र सामान्यांच्या  तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे.


मागील सुमारे वर्षभरापासून मनपामध्ये 'प्रशासक राज' आहे. या दरम्यान आगामी G20 बैठकीसाठी शहराच्या सौंदर्यीकरणावर लाखोंचे खर्च खासगी एजन्सींना काम देऊन करण्यात येत आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्येही रॅकिंग मिळविण्यासाठी मनपा प्रशासनाकडून तारेवरची कसरत करण्यात येत आहे. मात्र नागपुरकरांना भेडसावणाऱ्या खऱ्या समस्यांवर मात्र कुठलीच सुनावणी करण्यात आली नाही आहे.


नियमानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात दर्शनी भागात नागरिकांसाठी तक्रारपेटी असणे गरजेचे आहे. मात्र मनपा आयुक्त आणि प्रशासक बसत असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातच ही पेटी अस्तित्वातच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मनपाच्या इतर झोनच्या स्थितीबाबत विचार न केलेलाच बरा. दुसरीकडे तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना आवाक जावक विभागात पाठविण्यात येते. तसेच त्या ठिकाणहून पोच पावती घेण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय मनपा आयुक्तांकडे कोणी नागरिक तक्रार घेऊन आल्यास त्याला चिटकवेले सोशल मीडिया हँडलचे बारकोड दाखवून तेथे तक्रार करा असा सल्ला दिला जातो आणि त्याला आल्या पावली परतावे लागते. मात्र नागपुरकरांना केलेल्या ऑनलाईन तक्रारीवरही निवडक तक्रारी सोडवून मनपा सोशल मीडियावर Before आणि After ची पोस्ट टाकून आपली पाठ थोपटवून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.


'सोशल' उधळपट्टी थांबवा, संतप्त नागपूरकरांची मागणी


एकीकडे मनपाकडून महिन्याकाठी लाखो रुपयांची उधळपट्टी सोशल मीडिया हाताळणाऱ्या एजन्सीवर केली जाते. तर यावरही एक सोशल मीडिया समन्वयक म्हणून कंत्राटी तत्वावर आणखी एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे. मात्र यानंतरही नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागरिकांच्या मूलभूत तक्रारीही सोडविण्यात येत नसल्याने नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी मनपाने थांबवावी अशी संतप्त मागणी नागरिकांनी केली आहे.


स्वच्छतेसंदर्भातही नो रिस्पॉन्स




सजग नागरिक अभिजित सिंग चंदेल यांनी त्रिमूर्तीनगर चौकातील मनपाद्वारे चौकातच पसरवण्यात आलेल्या बांधकाम साहित्याबद्दल 25 जानेवार रोजी ट्वीट केले होते. त्यानंतर सुभाषनगर येथील एनआयटी उद्यानाजवळ एका मार्गाला चक्क जाळी लावून बंद केल्याची तक्रार 28 जानेवारी रोजी केली होती. तर 4 फेब्रुवारी रोजी बोले पेट्रोलपंप चौकात रस्त्यावर पडलेल्या वाळूमुळे होणाऱ्या अपघातांकडे मनपाचे ट्वीटद्वारे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले. अशा अनेक तक्रारी करुनही मनपाकडून एकदाही रिस्पॉन्स मिळाला नसल्याचे ते म्हणाले.


चिमुकल्यांचा जीव धोक्यात




साई मंदिर जवळ, रामकृष्ण उद्यानातील लहान मुलांसाठी असलेल्या तुटलेल्या आणि गंजलेल्या खेळण्यांबाबत वैभव गांजापुरे यांनी ट्वीट 28 जानेवारी रोजी ट्वीट केले होते. तसेच उद्यानात लहान मुलं खेळत असल्याने त्यांना या तुटलेल्या खेळण्यांमुळे दुखापत होण्याची शक्यताही वर्तवली होती. तसेच 28 जानेवारी रोजी रस्ता तोडून निघालेले सिमेंट, रेती गिट्टी तसेच सोडण्याबाबतही त्यांनी तक्रार केली होती. मात्र आतापर्यंतही मनपाकडून याची दखल घेण्यात आली नाही हे विशेष.


बांधकाम साहित्य पडून


अमित बांदूरकर यांनी 15 डिसेंबर रोजी झिंगाबाई टाकळी परिसरात रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रस्ता ब्लॉक केल्याची तक्रार ट्वीटद्वारे केली होती. यावरही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.


व्हीआयपींच्या झोनमध्येही अस्वच्छता




मनपाच्या धरमपेठ झोनमध्ये येणाऱ्या खरे टाऊन परिसरातील अस्वच्छतेबाबत रजत पडोळे यांनी 21 जानेवारी रोजी छायाचित्रांसह ट्वीट केले होते. त्यानंतर पुन्हा याची आठवण करुन देण्यासाठी हेच ट्विट कोट करुन 25 जानेवारी रोजी पुन्हा ट्वीट केले. तरी यावर कुठलीच कारवाई झाली नाही हे विशेष.


फुटपाथ तुटले, तरी मनपाला काय...




वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या तुटलेल्या फुटपाथबाबत एका युजरने 20 जानेवारी रोजी ट्वीट केले होते. पंचशील चौक ते फर्निचर दुकानापर्यंतचे हे तुटलेले जीवघेणे फुटपाथ आहे. यावरही कुठलीही अॅक्शन झाली नसल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे.


OCW ला सर्वकाही माफ?




मानकापूर येथील महावितरण कार्यालयाच्या बाजूला असलेले मनपाचे सिमेंट रोड तोडून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्लूने (Orange City Water Pvt. Ltd.) पाणी लाईन दुरुस्त करुन सर्व मलबा तसाच रोडवर सोडला असल्याचे ट्वीट 5 फेब्रुवारीला केले होते. यामध्ये मनपाच्या ऑफिशिअर ट्विटर हँडल आणि मनपाच्या आयुक्तांनाही टॅग केले होते. तरी यावर आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही हे विशेष.


त्यामुळे मनपाने नागपूरकरांच्या पैशांची एखाद्या खासगी एजन्सीवर लाखोंची सोशल उधळपट्टी थांबवून ग्राऊंडवर येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या अशी भावना व्यक्त केली आहे. तक्रार पेटी संदर्भात मनपाच्या आस्थापना विभागाचे राजकुमार मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाली नाही.


ही बातमी देखील वाचा...