Maharashtra Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी तो निर्णय घेतलेला नव्हता, तर तो काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार घेतला होता. त्यामुळे त्यांच्यावर केलेली ती टीका चुकीची असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेने मित्रपक्षाच्या निर्णयाचा मान राखावा...
आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, अशा शब्दात अतुल लोंढे यांनी शिवसेनेने सामनातून केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षात एक निर्णय प्रक्रिया आहे. त्यानुसारच निर्णय घेतले जातात. पक्षाध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला की पक्षातील सर्व जण त्याचा मान राखतात व त्यानुसार त्याची अंमलबजावणीही केली जाते. सोनिया गांधी यांनी त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून पक्षहितासाठी घेतलेला तो निर्णय होता.
‘जर-तर’च्या राजकारणात काहीच अर्थ नाही
नाना पटोलेंच्या (Nana Patole) राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकारसमोर संकटाची मालिका सुरू झाली या आरोपात काहीही अर्थ नाही. जर नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी कायम असते, तर पुढचा प्रसंग टळला असता, या ‘जर-तर’ ला राजकारणात काहीच अर्थच नसतो. नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळेच महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले, असे म्हणणेही योग्य नाही, त्याला इतरही काही कारणे असू शकतात, असे लोंढे म्हणाले.
थोरात पटोले वादावर बोलणे टाळले...
काँग्रेस पक्षाने काय निर्णय घ्यावेत, हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे. काँग्रेसचा निर्णय चुकीचा ठरला, असा आरोप करून मित्रपक्षाच्या निर्णयावर आक्षेप घेणे व त्यावर अशी जाहीरपणे टीका करणे आघाडीच्या धर्माला अनुसरून नाही, असेही लोंढे म्हणाले. सध्या सुरू असलेल्या बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या वादावर बोलण्याचे अतुल लोंढे यांनी टाळले. सद्यःस्थितीत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या बाबतीत पक्षश्रेष्ठी काय तो निर्णय घेतील आणि पक्षातील सर्वांनाच तो लागू असेल, असेही लोंढे यांनी सांगितले.
'या' वाक्याने नाना पटोले यांना केदार यांचा इशारा?
नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद केंद्रातील पक्षश्रेष्ठी निकाली काढतील, मात्र केंद्रातील नेत्यांची गरज भासायला नको. पिढ्यान्पिढ्या निष्ठा ठेवणारे राज्यातील नेते हा प्रश्न निकाली काढतील, असा विश्वास केदारांनी व्यक्त केला. आमच्या पक्षाच्या अंतर्गत असलेला प्रश्न आम्हीच सोडवू, थोरात साहेबांचा सन्मान झालाच पाहिजे. तुम्ही कितीही आकाशाला पोहोचला तरी आणि तुम्ही कितीही मोठे झाले असे समजत असाल तरीही थोरात साहेबांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना आम्ही सांभाळू, असे म्हणत केदारांनी एक प्रकारे नाना पटोले यांना इशाराच दिल्याचे बोलले जात आहे.