Nagpur IGGMC News : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) त्वचारोग विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी 'नॅशनल मेडिकल कौन्सिल'कडे (एनएमसी) निरीक्षणासाठी अर्ज केला होता. निरीक्षण होणार असल्याची माहिती मिळताच मेयो प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली करत अवघ्या 24 तासांमध्ये, मध्यरात्रीच्या सुमारास नवीन वॉर्ड तयार करण्याचा अफलातून प्रयोग केला. मात्र निरीक्षण सुरू असतानाच परिचारिकांनी आंदोलन करीत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  प्रशासनाचे पितळ उघडे पाडत पोलखोल केली.


कधीकाळी शासनाच्या अंदाज समितीने कठोर शब्दात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवर ताशेरे ओढले होते. त्यावेळी मेयोतील 40 एमबीबीएसच्या (MBBS) जागांना कायम करण्यासाठी अनेक समस्या लपवण्याचा प्रयत्न होत होता. वसतिगृह नसताना प्रादेशिक मनोरुग्णालयातील खोल्यांमध्ये खाटा दाखवण्यात येत होत्या. अनेक विद्यार्थी वसतिगृहाअभावी मेयो परिसरातील हॉटेलमध्ये राहात असत. ही लपवाछपवी मध्ये काही वर्षांसाठी बंद होती. परंतु पुन्हा एकदा खोटे चित्र उभे करण्याचा प्रकार मेयोत सुरू झाला. प्रशासनाचे खोटे रुप नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या पथकासमोर आणणे हाच या आंदोलनाचा उद्देश होता, असे परिचारिकांनी सांगितले.


आता दोनशे जागा


पूर्वी 100 प्रवेश क्षमता होती. यातील 40 जागांना मान्यता नव्हती. केवळ 60 जागांच्या क्षमतेनुसार इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (IGGMC) रुग्णालयात सोयी सुविधा होत्या. आता मेयो दोनशे प्रवेश क्षमता आहेत. सर्व जागांना मान्यता आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या सुविधा नाहीत. समस्यांच्या विळख्यात मेयो सापडले आहे.


एका रात्रीतून तयार झालेल्या वार्डात मेडिसीनचे रुग्ण


इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्वचारोग विभाग नाही. पदव्युत्तर विभाग सुरु करण्यासाठी नॅशनल मेडिकल कॉन्सिलचे निरीक्षण होणार हे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला माहिती होते. केवळ निरीक्षणाचा दिनांक ठरलेला नसल्याने प्रशासनाने कुठलीही पूर्वतयारी केली नव्हती. मात्र निरीक्षणाबद्दल माहिती मिळताच प्रशासनाने रात्रभरातून नवीन वार्डच अस्तित्वात आणून किमया करुन दाखविली आहे.


औषधांचाही कायम तुटवडा


शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार होईल या अपेक्षेने गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र रुग्णालयात ओपीडी वार्डातून लिहून देण्यात येणाऱ्या गोळ्यांपासून तर शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारांवरील उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांनाही औषधांवर खर्च करावा लागत आहे. या रुग्णालयांत फक्त डॉक्टर आणि रुग्णालयात भरती केल्यावर होणाऱ्या बेडचा खर्च वाचत असून इतर सर्व गोष्टींसाठी जागोजागी पैसे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया एका रुग्णाच्या नातेवाईकाने दिली.


ही बातमी देखील वाचा...


व्हॅनचा दरवाजा उघडला अन् मागून येणाऱ्या बसने चिरडले; नागपुरातील दुर्दैवी घटना


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI