नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. पट्टीचे खवय्ये म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या खाण्याच्या अनेक दंतकथा आहेत. याविषयी नितीन गडकरी यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत दिलखुलास उत्तरं दिली. मी खाद्य प्रेमी आहे मात्र मी एकाच वेळी खूप जास्त कधी खात नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. एबीपी माझाच्या विचारसंहिता कार्यक्रमांतर्गत दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी त्यांच्या खाद्यप्रेमावर भाष्य केलं.


यावेळी त्यांच्या 'खूप' खाण्याबाबत असलेल्या दंतकथेविषयी प्रश्न केला असता ते म्हणाले की, मी एकावेळी खूप जास्त खात नाही, असे ते म्हणाले.  खाण्याच्या प्रेमापोटी दिल्लीतील ऑफिसच्या माळ्यावर गार्डन रेस्टारंट तयार केले असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.  कॅबिनेटमध्ये नवीन पदार्थ आल्यावर मोदीजी सांगतात, नितीनजी का सुझाव है, असा किस्साही त्यांनी सांगितला.



यावेळी बजेटनंतर निवडणुकीला सामोरे कसे जाणार याविषयी विचारले असता ते म्हणाले की,  बजेटनंतर आम्हाला फायदा झाला आहे, आम्ही ताकदवान झालो आणि यामुळेच सर्व विरोध पक्ष एक झाले असे, नितीन गडकरींनी सांगितले.


यावेळी पुलवामानंतर निर्माण झालेली राष्ट्रप्रेमाची भावना ओसरत असल्याने निवडणूक ग्रामीण प्रश्नांभोवती केंद्रित झाली आहे, हे तुम्हाला अडचणीचे ठरेल काय? असा प्रश्न केला असता गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर इथे सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. देशात पहिल्यांदाच 20 हजार कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचन योजनेत मिळाले. राज्यात 26 सिंचन प्रकल्पांची कामे 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहेत. आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागाकरिता 108 प्रकल्प बळीराजा योजनेच्या अंतर्गत सुरु केले आहेत. पाच लाख कोटी रुपयांचे रस्ते मी बांधले आहेत. पुणे, कोल्हापूर रस्ता सहापदरी, मुंबई-गोवा रस्ता चारपदरी करण्याचे काम सुरु आहे. अशी अनेक कामे ग्रामीण भागासाठी सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले.

निवडणुकीत जाती-धर्माच्या मुद्द्यावरून केलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी फॉर्म भरताना 50 हजार लोकं उपस्थित होती. त्यात माझ्या जातीचे 500 लोकही नसतील, आम्ही जात पाहत नाहीत, असे सांगत विकासाला नजरेआड करता येत नाही असे, गडकरी म्हणाले. नोटाबंदीमुळे दोन नंबरच्या आर्थिक व्यवहारांना धक्का बसला असल्याचेही या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी सांगितले.

गडकरींच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे
- भाजप हा कोणत्याही एका व्यक्तीचा पक्ष नाही
- पाच वर्ष आम्ही जे काम केले त्याचे परफॉर्मन्स ऑडिट म्हणजे ही निवडणूक
-  धोक्याची घंटा नाही, अपवाद वगळता आम्ही सर्व निवडणुका जिंकल्या
- जोशी, अडवाणीजी यांच्याविषयी सन्मान कायमच, प्रत्येक क्षेत्रात पिढी बदलत असते
- मागील वेळेपेक्षा जास्त जागा यावेळी जिंकू, मोदीजीच पंतप्रधान असतील
- मी अर्थमंत्री नाही, होण्याची शक्यताही नाही.
- जीएसटी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा इकॉनॉमिक रिफॉर्म आहे
- चौकीदार हा कॅम्पेनचा प्रकार आहे. चौकीदार म्हणण्यात काही गैर नाही