Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे खंडणी मागणं आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणाचा खटला मुंबईला स्थलांतरित केला जावा यासाठी एनआयएने (NIA) मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठात (Nagpur Bench) अपील दाखल केलं आहे. न्यायालयाने या अपिलावर सुनावणी करत राज्य सरकार आणि मुख्य आरोपी जयेश पुजारी यांना नोटीस बजावून यावर 30 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे.


एनआयएने 15 जुलै रोजी नागपूरमधील विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल करुन इथला न्यायिक रेकॉर्ड मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात स्थानांतरित करण्याची मागणी केली होती. तसंच नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमधील रेकॉर्डही मागितला. 18 जुलै रोजी विशेष सत्र न्यायालयाने न्यायिक रेकॉर्ड मुंबईला स्थानांतरित करण्याची मागणी नामंजूर केली. त्याविरुद्ध एनआयएने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द करुन इथल्या खटल्याचा रेकॉर्ड मुंबईला स्थानांतरित करण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती एनआयएने हायकोर्टात केली आहे.


नागपूरच्या विशेष कोर्टाने काय म्हटलं होतं?


18 जुलै रोजी नागपूरच्या विशेष न्यायालयाने म्हटलं होतं की, गडकरी धमकी प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवता येणार नाही. नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल होते मग एनआयए मुंबईत तिसरा गुन्हा का नोंदवला अशी विचारणाही न्यायालयाने केली होती. धमकीच्या दोन्ही प्रकरणी नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) धंतोली पोलीस स्टेशनमध्ये यूएपीए कायद्याअंतर्गत आधीच गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे त्या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांनी करावा. एनआयएला तपास करायचा असल्यास त्यांनी तपास करुन चार्जशीट नागपूरच्या न्यायालयात दाखल करावी, असंही न्यायालयाने म्हटलं. तरीही एनआयएला दोन्ही प्रकरणाचा तपास आपल्याकडे हवा असेल तर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करावा, असंही न्यायालयाने नमूद केलं.


नितीन गडकरी यांना धमकीचे कॉल


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात 4 जानेवारी आणि 21 मार्च धमकीचे फोन आले. तेव्हा कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. बेळगाव तुरुंगातून धमकीचे फोन आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.  त्यानंतर नागपूर पोलिसांनी 28 मार्च रोजी जयेश पुजारी उर्फ शाकीरला बेळगाव तुरुंगातून ताब्यात घेऊन नागपुरात आणले होते. नागपूर पोलिसांच्या चौकशीत जयेश पुजारीने सुरुवातीला दिशाभूल केली. मात्र त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीमध्ये धमकीच्या कॉल्सचे सूत्रधार वेगळेच असल्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांनी मग त्यांचा तपास त्या दिशेने सुरु झाला. 


गडकरींच्या कार्यालयात  21 मार्च रोजी दुसऱ्यांदा धमकीचा फोन आला. खंडणीसाठी कर्नाटकमधील एका तरुणीचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. तेव्हा पोलिसांनी त्या तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या रिजवाना नावाच्या तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहिच्या आधारावर बशीरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा हा यामगचा खरा सूत्रधार असल्याचं समोर आलं.  


संबंधित बातमी


Nitin Gadkari Threat Call : गडकरी धमकी प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवता येणार नाही, नागपूर कोर्टाकडून याचिका निकाली