Nagpur Fraud : 'नासा' (NASA) या संस्थेमध्ये नोकरी मिळवणं जगभरातील तरुणांचं स्वप्न असते... मात्र, नागपुरातील एका भामट्याने एक-दोन नव्हे तर तब्बल 111 जणांची नासामध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक केली आहे.  ओमकार तलमले असे फसवणूक करणाऱ्याचं नाव असून ओमकारने या 111 जणांकडून तब्बल 5 कोटी 31 लाख 70 हजार रुपये लुबाडले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ओमकारने पैशांचे आमिष दाखवून दोन व्यापाऱ्यांची हत्या देखील केली. 


ओमकारने पैशांचे आमिष दाखवून एका आठवड्यापूर्वी नागपूर शहरातील दोन व्यापारांची काही गुंडांच्या मदतीने अपहरण करून कोंढाली जवळ हत्या केली होती आणि त्यानंतर दोघांचे मृतदेह वर्धा जिल्ह्यातील नदीत फेकून दिले. याप्रकरणी ओमकारला नागपूर पोलिसांकडून अटक झाल्यानंतर हिंमत बळावलेल्या तरुणांनी समोर येऊन फसवणुकीची नागपूर शहर पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा हा प्रकार समोर आलाय. ओमकारने अनेक तरुणांना खोटं अपॉइंटमेंट लेटरही पाठवलं होतं.नासामध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.


नासाच्या खोट्या लेटर पॅडवर अपॉइंटमेंट लेटर पाठवले


फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे ओमकार तलमले याने तो 2017 पासून नासामध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले होते.  तो आपल्या संपर्काच्या माध्यमातून नासा आणि इस्रो सारख्या संस्थांमध्ये नोकरी लावून देऊ शकतो अशी स्वप्न तरुणांना दाखवत होता. त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने लाखो रुपये लुबाडत होता. ओमकार ने अनेक तरुणांना नासाच्या खोट्या लेटर पॅडवर अपॉइंटमेंट लेटर ही पाठवले होते. सध्या ओंकार तलमले हत्येच्या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत आहे. लवकरच नागपूर शहर पोलीस फसवणुकीच्या या प्रकरणात त्याचा ताबा घेणार आहे आणि त्यानंतर फसवणुकीच्या या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार आहे.


नागपुरात ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक 


नागपुरात ऑनलाईन गेमच्या (Online Game) माध्यमातून एका व्यापाऱ्याची तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. नोव्हेंबर 2021 पासून ही फसवणूक सुरु होती. तक्रारदार व्यापारी व्यवसायानिमित्त आरोपीच्या संपर्कात आला होता. त्यामुळे दोघांचा परिचय होता. आरोपीने ऑनलाईन गेमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा असल्याची बतावणी केली. आरोपीने फिर्यादीला एक लिंक पाठवून त्यावर रम्मी,कसिनो आणि तीनपत्ती या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवले दाखवले. आधी व्यापाऱ्याने त्यास नकार दिला. मात्र, आरोपीने जास्तच आग्रह केल्याने व्यापारी तयार झाला. ऑनलाईन गेमिंगच्या (Online Game) माध्यमातून फसवणूक करणाऱ्या अनंत उर्फ सोंटू जैन या बुकीच्या गोंदियामधील (Gondia) चार बँक लॉकरमधून नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Nagpur Police) 4.54 कोटी रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने एवढं ऐवज जप्त केले आहे. 


हे ही वाचा :


Kalyan Crime News : गु्ंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; कल्याणचा ठग शिर्डीतून ताब्यात