Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयजवळील जनसंपर्क कार्यालयात तीन वेळेस धमकीचा फोन आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या धमकीच्या फोन कॉलनंतर तपास चक्र वेगाने फिरत आहे. आतापर्यंत झालेल्या तपासानुसार तीन वेळेला आलेल्या धमकीच्या फोन कॉलचा संबंध कर्नाटकात (Karnataka) असल्याचे समोर आले आहे. या धमकीच्या फोन कॉल प्रकरणी नागपूर पोलिसांसह (Nagpur Police) दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि आयबीचे (IB) पथकही तपास कामात गुंतले आहेत.  


नितीन गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालय जवळच्या जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी एका तासाच्या कालावधीत तीन वेळेस धमकीचे फोन कॉल आहे. हे तीन फोन कॉल सकाळी 11:29 वाजता, 11:35 वाजता आणि 12:32 वाजता या दरम्यानच्या वेळेस आले होते. फोन कॉल करणाऱ्याने नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडे दहा कोटींची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम न दिल्यास गडकरी यांना जीवे मारू अशी धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने दाऊद असा शब्द उच्चारल्यानंतर गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचारी घाबरले. त्यांनी लगेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक धंतोली पोलीस स्टेशनचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरी यांच्या जनसंपर्क दाखल झाले आणि चौकशी सुरू केली. 


गडकरींच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ होणार


तपासासाठी एटीएसच्या पथकाला ही पाचारण करण्यात आले. झोन 2 चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी गडकरी यांच्या कार्यालयात तीन वेळेला धमकीचे कॉल आले आणि त्यामध्ये जीवे मारल्याची धमकी देण्यात आल्याच्या माहितीला दुजोरा दिला. हे कॉल्स गडकरी यांच्या कार्यालयातील लँडलाईन नंबरवर आले होते. हे फोन क्रमांक एका बीएसएनएलच्या क्रमांकावरून करण्यात आले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे. हे कॉल कोणी केले, त्याचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त राहुल मदने म्हणाले. 


या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी गडकरी यांची वैयक्तिक सुरक्षा तसेच त्यांच्या कार्यालय आणि निवास स्थानासमोरील सुरक्षा वाढविली आहे. त्याशिवाय गडकरी ज्या कार्यक्रमासाठी जातील तिथे ही सुरक्षा वाढविली जाईल असेही पोलीस उपायुक्त राहुल मदने म्हणाले. 


संघ मुख्यालयात धमकीचा फोन कॉल कुठून आला?


काही दिवसांपूर्वी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला उडवून टाकू अशाच धमकीचा कॉल संघ कार्यालयात आला होता. त्याचा तपास नागपूर पोलिसांनी सुरू केला. मात्र अजूनपर्यंत त्यासंदर्भातही कुठली ठोस माहिती तपासात समोर आलेली नाही. 'एबीपी माझा'ला खात्रीलायक पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे संघ मुख्यालय उडवून टाकण्याची धमकी देणारा तो कॉल इंटरनेट कॉल होता. आतापर्यंतच्या पोलीस तपासामध्ये आरएसएस कार्यालयात आलेल्या धमकीच्या कॉलचा लोकेशन वारंवार बदलत असल्याचे दिसून आले आहे. हे लोकेशन कधी सिंगापूर, कधी इंडोनेशिया, कधी मलेशिया अशा विविध ठिकाणचे आढळून येत आहे.