Nagpur News : बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे बऱ्याच सीबीएसई शाळा (CBSE Schools) चालवल्या जात असल्याची धक्कादायक बाब पुण्यात उघडकीस आल्यानंतर नागपूर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी नागपूर जिल्ह्यातील शाळांची तपासणी सुरु केली असून शहरातील 125 पेक्षा अधिक शाळांपैकी फक्त 80 शाळांना एनओसी सादर केली आहे. तसेच उर्वरित शाळांकडून एनओसी देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.


प्राप्त माहितीनुसार दलालांनी शाळा व्यवस्थापनांकडून पैसे उकळून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) मान्यतेचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलं होतं. या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारेच बऱ्याच सीबीएसई शाळा चालवल्या जात असल्याची धक्कादायक बाब पुण्यात उघडकीस आली होती. त्यानंतर राज्यभरातील सीबीएसई शाळांच्या मान्यतेबाबत शंका निर्माण झाली आहे. राज्य शिक्षण आयुक्तालयामार्फत सीबीएसईच्या 666 शाळांची तपाणी सुरू आहे. 


शिक्षणाधिकारी स्वतः करणार पडताळणी


नागपूर जिल्ह्यातही सीबीएसईच्या 125 हून अधिक शाळा असून, या शाळांना एनओसी सादर करण्यासाठी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात 80 शाळांनीच एनओसी सादर केली. उर्वरित शाळा यासाठी टाळाटाळ करत असून, शिक्षण विभागाला दाद देत नसल्याचे चित्र आहे. आता विभागातील अधिकारीच खुद्द शाळांमध्ये जाऊन एनओसी तपासणार असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य मंडळाव्यतीरिक्त इतर मंडळाच्या अभ्यासक्रमांशी सलग्न शाळांना 'ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याची कार्यवाही राज्य सरकार स्तरावरुन होत असते. परंतु पुण्यात काही शाळा, संस्था चालकांनी चक्क बनावट एनओसी मिळविल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. दरम्यान संबंधित शाळांचे एनओसी बाबतचे कोणतेही आदेश शासन स्तरावरुन काढले नसल्याची माहिती उघड झाली आहे. मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची नावे आणि बनावट स्वाक्षºयांचा वापर करुन संबंधित सीबीएसई शाळांना ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार पुढे आला होता. 


40  शाळांकडून टाळाटाळ


यासंदर्भात शिक्षण विभागाने पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी राज्यभरातील 666 ही शाळांची एनओसी तपासण्याचे आदेश जारी केले. त्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातीलही सीबीएसईच्या शाळांनी असाच प्रकार तर केला नाही ना? याची शहानिशा करण्यासाठी आता माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व सीबीएसई शाळांना एनओसीच्या मूळ प्रतिची पडताळणी करण्यासोबतच एक झेरॉक्स प्रत शिक्षण विभागाकडे सादर करण्यासाठी गुरुवारी सीताबर्डीतील पटवर्धन हायस्कूल येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 80 शाळांनी एनओसीची पडताळणी करुन झेरॉक्स प्रत विभागाकडे सादर केली आहे. तर उर्वरित शाळा अद्यापही टाळाटाळ करत असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.


लवकरच तपासणी


शिक्षण आयुक्तालयामार्फत राज्यातील खाजगी व्यवस्थापनाव्दारे राज्य मंडळाच्या व्यतिरिक्त इतर मंडळाशी सलग्न असणाऱ्या सीबीएसई, आयसीएसई आदी शाळांना त्यांचेकडील शासन मान्यता आदेश नाहरकत प्रमाणपत्राची मूळ प्रत पडताळणीसोबतच एक प्रत विभागाकडे संकलनासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामधून 80 शाळांची एनओसी विभागाकडे सादर झाली. अद्यापही सुमारे चाळीसवर शाळा हे विभागाला दाद देत नसून, टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा सूचना करण्यासोबतच विभागातील अधिकारी खुद्द शाळा भेटीद्वारे हे एनओसी तपासणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.


ही बातमी देखील वाचा...


केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षेत वाढ


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI