Nagpur MLA Residence : नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session) सुरु आहे. विधिमंडळात वेगवेगळ्या मुद्द्यांवर गोंधळ घालणारे आमदार जनतेच्या हिताच्या मुद्द्यावर चर्चा करत नाही अशी सामान्य माणसांची तक्रार असते. हेच माननीय आमदार त्यांच्यासाठी उभारलेल्या आमदार निवासात (MLA Residence) न राहता मोठमोठ्या हॉटेल्समध्ये निवास करतात आणि आमदार निवासात पीए आणि कार्यकर्त्यांना ठेवतात अशीही तक्रार होत असते. यंदा 403 खोल्या असलेल्या आमदार निवासात फक्त 42 च आमदार का राहत आहे याचा आढावा एबीपी माझाने घेतला आहे.


सुमारे पाच एकर क्षेत्रात विस्तारलेल्या आमदार निवासामध्ये 403 खोल्या असून क्षमतेनुसार महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराला या ठिकाणी खोली मिळेल एवढी व्यवस्था आहे. मात्र असे असतानाही या अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे फक्त 42 आमदार राहत आहेत. 403 खोल्या असतानाही फक्त 42 च आमदार इथे का राहतात आणि उर्वरित आमदार खर्च करुन हॉटेलमध्ये का राहतात असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो.


आमदार निवासातील खोली कशी आहे?


एबीपी माझानेही आमदार निवासात आमदारांच्या खोलीची पाहणी केली. पंधरा बाय दहा फुटाची खोली एका लाकडी पार्टिशनने दोन भागात विभागली गेली असून एका बाजूला आमदाराच्या राहण्याची सोय करण्यात आली असून तिथे एक पलंग एक टेबल आणि एक अलमारी आहे. तर त्याच खोलीत पार्टिशनच्या दुसऱ्या बाजूला आमदारांच्या राहण्याची सोय असून तिथे दोन पलंग आणि दोन खुर्च्या आहेत. आमदारांना दिल्या जाणाऱ्या गादी आणि चादरी दिसायला पांढऱ्या शुभ्र असल्या, तरी त्याच्यावर झोपल्यानंतर अंगाला खाज सुटते अशी अनेकांची तक्रार आहे. त्यामुळे आमदार निवासात राहणाऱ्या आमदारांनी पांघरण्यासाठी मिळालेल्या मखमली ब्लॅंकेटला चादरीवर टाकून त्यावर झोपण्याची मखमली युक्ती काढली आहे. प्रत्येक खोलीत टीव्ही असला तरी तो सुरुच असेल याची शाश्वती नाही. शिवाय बाथरुममध्ये असलेलं गिझर तुम्हाला गरम पाणी देईलच याची कोणतीही गॅरंटी नसते. याच कारणामुळे अनेक आमदार अधिवेशन काळात आमदार निवासाऐवजी हॉटेलमध्ये राहण्याला प्राधान्य देतात.


यंदा आमदार निवासाच्य डागडुजीवर 12 कोटी रुपये खर्च


आमदारांच्या या तक्रारी ऐकतानाच आमदार निवासावर दरवर्षी होणाऱ्या खर्चाकडे नजर टाकणेही तेवढेच महत्त्वाचं आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन आणि त्या निमित्ताने आमदार निवासावर सार्वजनिक बांधकाम विभाग कोट्यवधी रुपयांचा खर्च करतो. गेले दोन वर्ष नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले नाही. त्यामुळे यावर्षी अधिवेशन आणि आमदार निवासावर झालेला खर्च काहीसा जास्तच आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे अधिवेशनासाठीचा एकूण खर्च 95 कोटी रुपयांचा असला तरी आमदार निवासातच यंदा सुमारे 12 कोटी रुपये डागदुजी, दुरुस्ती, रंगरंगोटी आणि इतर सुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. जर आपण 12 कोटींचा खर्च ग्राह्य धरला तर यंदा आमदार निवासात राहणाऱ्या 42 आमदारांपैकी प्रत्येक आमदारामागे सुमारे 2 लाख 97 हजारांचा खर्च झाला आहे.


कॅन्टीनमधून रुम सर्विस नाही


आमदार निवासामध्ये आमदार का राहत नाही याचा एक आणखी प्रमुख कारण म्हणजे आमदार निवासातील कॅन्टीन (भोजनालय). या ठिकाणी मिळणाऱ्या जेवणाबद्दल आमदारांची तक्रार असतेच मात्र एक महत्त्वाची तक्रार म्हणजे या कॅन्टीनमधून रुम सर्विस मिळत नाही म्हणजेच फोनवर ऑर्डर दिली तर आमदारांना खोलीमध्ये गरमागरम जेवण आणि खाद्यपदार्थ त्वरित मिळत नाहीत. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे लगेच रुम सर्विस देणं शक्य होत नाही असं स्पष्टीकरण कॅन्टीन व्यवस्थापकाने दिलं आहे.


सामान्य जनतेसाठी हक्काचा निवारा


आमदार निवासाचं नाव जरी आमदार निवास असं असल आणि ते फक्त विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पंधरा-वीस दिवसांच्या कालावधीसाठी आमदारांच्या वापरासाठी येत असला तरी उर्वरित साडेअकरा महिने राज्यभरातील विविध आमदारांच्या मतदारसंघातून नागपुरात शासकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, शैक्षणिक आणि इतर अनेकविध कारणांनी येणाऱ्या सामान्य जनतेसाठी ते एक हक्काचा निवारा आहे. आपल्या आमदाराच्या शिफारशीने त्या ठिकाणी राहणे आणि अत्यल्प दरात जेवणे हे हजारो नागरिकांसाठी फक्त आमदार निवासामुळेच शक्य होते. त्यामुळे जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेलं आणि दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च असलेलं आमदार निवास माननीय आमदारांपेक्षा त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते आणि सामान्य जनतेच्या उपयोगात येते हे एक कटू सत्य आहे. 


संबंधित बातमी