नागपूर : "काहीही करा पण माझ्या मुलीचा मृतदेह मला मिळवून द्या," अशी आर्त साद नागपुरातील (Nagpur) भाजपच्या नेत्या सना खान (Sana Khan Murder Case) यांच्या आई मेहेरुनिस्सा खान यांनी पोलीस प्रशासनाला घातली आहे. "सना खान यांचा 13 वर्षीय मुलगा वारंवार आपल्याला आईच्या मृतदेहासंदर्भात विचारणा करतो, त्याला उत्तर देणे आम्हाला कठीण झालंय. आम्ही त्याला काय उत्तर द्यावं?" असा भावनिक प्रश्नही मेहेरुनिस्सा खान यांनी विचारला आहे.
'अमित साहूची नार्को चाचणी झाल्यास सत्य बाहेर येईल'
सना खान यांची हत्या केल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच अमित शाहू आणि त्याचे सहकारी पोलिसांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे त्यांच्या तोंडून सत्य बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी नार्को अॅनालिसिस किंवा इतर वैज्ञानिक चाचण्यांचा वापर करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी अमित साहूच्या नार्को अॅनालिसिस चाचणीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अमित साहूची नार्को चाचणी झाल्यास सर्व सत्य बाहेर येईल असे मेहेरुनिस्सा खान म्हणाल्या.
काँग्रेस आमदार संजय शर्मा यांच्या भूमिकेवर सना यांच्या आईला संशय
मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार संजय शर्मा यांच्या भूमिकेबद्दलही सना खान यांच्या आईने संशय व्यक्त केला आहे. सना खान यांची हत्या केल्यानंतर अमित साहू हा आमदार संजय शर्मा यांना भेटला होता, असे स्वतः आमदारांनी सांगितले आहे. मध्य प्रदेशात एवढे आमदार असताना तो फक्त त्यांनाच का भेटला? याचाच अर्थ आमदार संजय शर्मा मला वाचवतील असा अमित साहूचा विश्वास होता. त्यामुळे याप्रकरणी आणखी तपास पोलिसांनी करायला हवा, अशी मागणी सनाच्या आईने केली आहे.
मृतदेह दुसऱ्याच ठिकाणी लपवला असावा
आतापर्यंत सना खान यांचा मृतदेह तर सोडा तिची बॅग, कपडे किंवा ज्या चादरीत गुंडाळून तिचा मृतदेह फेकल्याचा आरोपींचा दावा आहे, त्यापैकी काहीही मिळालेलं नाही. त्यामुळे आरोपींनी सना खान यांचा मृतदेह दुसऱ्याच ठिकाणी लपवल्याचं सना खान यांच्या आईचं म्हणणं आहे.
मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एका विहिरीत मिळालेल्या मृतदेहाचे सॅम्पल पोलिसांनी घेतले आहेत. पुढील दोन दिवसात डीएनए चाचणीसाठी सना खान यांच्या कुटुंबीयांचे रक्ताचे नमुनेही घेतले जाणार आहेत.
25 दिवस उलटले मात्र अद्यापही मृतदेह मिळालेला नाही
दरम्यान भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या 34 वर्षीय कार्यकर्त्या सना खान यांची हत्या होऊन 25 दिवस उलटले, तरी त्यांचा मृतदेह मिळालेला नाही. सना खान यांच्याबाबतीत नेमके काय झाले याचे उत्तरही नागपूर पोलीस देऊ शकलेले नाहीत. या प्रकरणी आजवर सना खान यांचा कथित पती अमित साहू, अमितचे मित्र राजेश सिंह, धर्मेंद्र यादव, रविशंकर यादव आणि कमलेश पटेल अशा पाच आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा
Nagpur Crime : सना खान यांच्याशी आपला कोणताही संबंध नव्हता; आमदाराचा नागपूर पोलिसांसमोर दावा