नागपूर : भाजप कार्यकर्त्या सना खान (Nagpur Sana Khan Case) यांच्या हत्या प्रकरणात आज नागपुरात हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचं पाहायला मिळालं. एका बाजूला मध्यप्रदेशचे आमदार संजय शर्मा नागपूर पोलिसांसमोर हजर राहून सना खान आणि त्यांच्या प्रकरणातील आरोपींशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावा केला. तर दुसऱ्या बाजूला सना खान यांच्या आई मेहेरूनिस्सा खान यांनी सना खान यांच्या हत्या प्रकरणाचा तपास भटकवण्यासाठी हनी ट्रॅपचा मुद्दा मधे आणला जात असल्याचा आरोप केला आहे.
भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या 34 वर्षीय कार्यकर्त्या सना खान यांची हत्या होऊन 22 दिवस उलटले, तरी त्यांचा मृतदेह मिळालेला नाही. सना खान यांच्या बाबतीत नेमके काय झाले याचा उत्तरही नागपूर पोलीस देऊ शकलेले नाहीत. याप्रकरणी आजवर सना खान यांचे कथित पती अमित साहू, अमितचे मित्र राजेश सिंह, धर्मेंद्र यादव, रविशंकर यादव आणि कमलेश पटेल अशा पाच आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.
याच आरोपींशी जुना संबंध असल्याच्या संशयावरून आज मध्य प्रदेशातील तेंदूखेडा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय शर्मा यांना चौकशीसाठी नागपुरात बोलावण्यात आले होते. नागपूरच्या डीसीपी झोन 2 कार्यालयात तब्बल सव्वा दोन तास संजय शर्मा यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यांची सना हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी अमित साहू आणि रविशंकर यादवच्या समोरासमोर बसून ही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. चौकशीनंतर आमदार संजय शर्मा यांनी या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नाही, आरोपी अमित साहू कधी काळी आपल्याकडे कामावर होता. मात्र, गेले पाच ते सात वर्ष तो आपल्या संपर्कात नाही असा दावा केला.
दुसऱ्या बाजूला पोलिसांनी सना हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने काही गोष्टी आपापसात जोडणे आवश्यक आहे, तेच पोलीस करत असून आमदार संजय शर्मा यांना त्याच उद्दिष्टाने बोलावल्याचा दावा नागपूर पोलिसांनी केला आहे. आमदार शर्मा यांनी सहकार्य केले असून लवकरच या प्रकरणांमध्ये काही ठोस माहिती समोर येईल असा दावा ही पोलिसांनी केला आहे.
दरम्यान डीसीपी कार्यालयात आमदार संजय शर्मा यांची चौकशी सुरू असताना सना खान यांच्या आई देखील त्या ठिकाणी पोहोचल्या. कोणीही कितीही मोठा खासदार आमदार असला तरी या प्रकरणात वाचणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान सना खान हत्याप्रकरणाचा हनी ट्रॅपशी काहीही संबंध नाही, हत्या प्रकरणाचा तपास भटकवण्यासाठीच हनी ट्रॅपची फोडणी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, अमित साहूचे जे दोन मोबाईल फोन पोलिसांना मिळाले आहेत, त्यामध्ये मोठ्या संख्येने लोकांचे आपत्तीजनक अवस्थेतील अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. ते पाहता नागपूर पोलीस सना खान हत्या प्रकरणाचा हनी ट्रॅपशी संबंध असल्याच्या आपल्या दाव्यावर ठाम आहे.
ही बातमी वाचा: