नागपूर: जिल्हा परिषदेच्या (Nagpur District) आरोग्य केंद्रातील डॉक्टरला वेळेत चहा-बिस्कीट न मिळाल्यामुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अर्धावर सोडून तो निघून गेल्याची घटना घडली होती. आता त्या डॉक्टरला कारवाई का करू नये अशी विचारणा करत शल्य चिकित्सकांनी नोटीस बजावली आहे. डॉ. तेजराम भलावी असं संबंधित डॉक्टरचे नाव आहे.
शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे नागपूर शासकीय रुग्णालयाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे सदर प्रकरणी डॉ. भलावी यांना नोटीस बजावून उलट तपासणी खुलासा सादर करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉएन.बी राठोड यांनी दिले आहे.
काय आहे प्रकरण?
नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (Nagpur Zilla Parishad Primary Health Center) नियोजित शस्त्रक्रिया ठरली होती. त्यानुसार सर्व तयारी देखील करण्यात आली होती. चार महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली जाणार होती. डॉक्टर आरोग्य केंद्रात वेळेवर आले खरे, पण त्यांना वेळेत चहा बिस्कीट मिळाळी नाहीत. यावर डॉक्टरांना राग अनावर झाला आणि डॉक्टर आरोग्य केंद्रातून तडकाफडकी निघून गेले.
डॉक्टरांच्या कृत्याचा नाहक त्रास चारही महिला रुग्णांना सहन करावा लागला. शुक्रवारी (3 ऑक्टोबर) ही धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी कुंदा राऊत यांची चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणात कारवाईचा बडगा उगारत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन .बी राठोड यांनी डॉ. भलावी यांना नोटीस बजावून खुलासा मागितला आहे.
कारवाई का करू नये? खुलासा सादर करा
कुठल्याही आजारातील पीडित रुग्ण डॉक्टरांना देवासमान मनात असतो. मात्र केवळ वेळेत चहा बिस्कीट मिळाली नाही म्हणून सामान्य रुग्णाच्या जीवाला वेठीस धरणे हे माणुसकीला धरून नाही. या प्रकरणी समाजातील सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. नंतर या प्रकरणी डॉ. भलावी यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.वरिष्ठांची परवानगी न घेता ग्रामीण रुग्णालय, तसेच शिबिराच्या ठिकाणावरून वाद घालून शस्त्रक्रिया अर्ध्यावर टाकून निघून जाणे, आपल्या कर्तव्यात कसूर करणे हे कार्यालयीन शिस्तीच्या विरुद्ध आहे. त्यामुळे आपल्यावर कारवाई का करू नये याबाबत उलटटपाली खुलासा सादर करावा असे राठोड यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.
ही बातमी वाचा: