अमरावती: पीक विमा कंपनी ( Insurance Company ) आणि शेतकरी (Farmers ) यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा, मोसंबी, कापूस, तूर इत्यादी सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असताना पीक विमा कंपनीला आवश्यक ती माहिती आणि कागदपत्रे पुरवून देखील विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने वरुड (Warud ) येथील ठाकरे गटाच्या उमेश शहाणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रिलायन्स जनरल इंशुरन्स कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. वारंवार पाठपुरावा करून आणि वेळोवेळी सगळी माहिती शासन दरबारी आणि इंशुरन्स कंपनीला पोहचवली असूनही त्याची दखल न घेतल्याच्या रागातून हे कार्यालय फोडण्यात आले.


शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारातच साजरी करावी का?


राज्यात आणि  विशेषतः विदर्भात नापिकी आणि कर्जबाजारीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नुकतीच ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर विदर्भातील भिवापूर येथील एक शेतमजूर व एक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्याची घटना ताजी असतानाच विमा कंपनीद्वारे शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याची माहिती समोर येत आहे. बेभरवशाच्या हवामानामुळे विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पांढरे सोने म्हणून समजले जाणारा कापूस योग्य भाव न मिळाल्याने आजही दिवाळीच्या तोंडावर घरावर पडून आहे. तर संत्रा, मोसंबी, कापूस, तूर सोयाबीन इत्यादी सर्व पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वत्र दिवाळी साजरी होत असतांना  विमा कंपनीच्या या दिरंगाई मुळे आम्ही आमची दिवाळी अंधारात साजरी करावी का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 


अन्यथा जिल्ह्यातील सर्व कार्यालय फोडून शेतकऱ्यांना देऊ न्याय


शेतकऱ्यांची शासन आणि विमा कंपनी द्वारे दखल घेतली जात नाही.जिल्हातील संत्रा, मोसंबी, कापूस, तूर या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून विमा कंपनी आणि सरकार मोगलाई प्रमाणे वागत आहे. जाणूनबुजून सरकार आणि इंशुरन्स कंपनी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी करू पाहत असल्याचा आरोप उमेश शहाणे यांनी केला आहे. शासनाने शेतकऱ्यांची भावना समजून घ्यावी आणि जिल्ह्यातील रिलायन्स जनरल इंशुरन्स कंपनीने शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन योग्यती कारवाई करावी अन्यथा संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील रिलायन्स जनरल इंशुरन्स कंपनीचे कार्यालय फोडून शेतकर्यांना न्याय देवू असा इशारा  शिवसेनेचे कार्यकर्ते उमेश शहाणे बोलतांना व्यक्त केला आहे.


ही बातमी वाचा: