नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या संख्येनं कोरोनाबाधित झालेल्या व अनेक पोलिसांच्या मृत्यूचं नुकसान सोसणाऱ्या नागपूर पोलिसांनी दुसऱ्या लाटेपूर्वी स्वतःचं लसीकरण, रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे व 100 टक्के मास्कचा वापर या गोष्टींची अंमलबजावणी करुन स्वतःला मजबूत केलं.


या गोष्टी केल्यामुळे पहिल्या लाटेच्या तुलनेत महाभयंकर दुसऱ्या लाटेत नागपूर पोलिसांचे बाधित होण्याचे व मृत्यूचे प्रमाण दोन तृतीयांशने कमी झाल्याचं दिसून आलंय.  


विशेष म्हणजे एप्रिल व मे महिन्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट नागपुरात प्रचंड तीव्र असल्यामुळे दोन लाख 43 हजार नागपूरकर बाधित झाले होते. याच कालावधीत फक्त 650 पोलीस बाधित झाले. पहिल्या लाटेत ही संख्या 1786 होती. 


दुसऱ्या लाटेपूर्वी 95 टक्के पोलीस दलाचे पहिल्या डोजचे लसीकरण, लक्षणे दिसताच त्वरित चाचणी, सार्वजनिक ठिकाणी शंभर टक्के मास्कचा वापर या गोष्टी पाळण्यात आल्या. तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्यायाम, योग्य आहार व विश्रांती या त्रिसूत्रीद्वारे नागपूर पोलिसांनी ही किमया साधली आहे.


राज्यातील सर्व पोलीस दल कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भरडलं गेलं असताना नागपूर पोलिसांनी मात्र यावर यशस्वीरित्या मात केली असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे हा नागपूर पॅटर्न सर्व राज्याला आदर्श ठरु शकतो. 


महत्वाच्या बातम्या :