मुंबई : नैऋत्य मान्सूनचं आगमन म्हणजे भारतासाठी आनंददायक क्षण. त्याच्या आगमनाच्या तारखेकडे समस्त भारतीयांचं लक्ष लागलेलं असतं. या मान्सूनने दक्षिण अंदमान समुद्रात आणि कार निकोबार बेटांवर एक दिवस आधीच म्हणजे 21 मे रोजी हजेरी लावली आहे आणि आपला प्रवास पुढे सुरु ठेवला आहे. आता भारताच्या वेशीपर्यंत मान्सून पोहोचला असून केरळच्या मुख्यभूमीवर त्याचं कधीही आगमन होऊ शकतं अशी परिस्थिती आहे.
नैऋत्य मान्सूनने मालदिव बेट, कोमोरिन समुद्र, श्रीलंका आणि दक्षिण आणि पूर्व बंगालच्या उपसागराचा मोठा भाग व्यापला आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर तोक्ते चक्रिवादळ त्यानंतर पूर्व किनाऱ्यावर यास चक्रीवादळाने धडक दिली. या दोन वादळांमुळे भारताकडे सरकत असलेल्या मान्सूनच्या गतीत वाढ झाली आहे.
विषृववृत्तावरील अरबी समुद्राचा भाग, लक्षद्वीप बेटं आणि केरळमध्ये मान्सूनच्या निर्मितीसाठी आवश्यक पार्श्वभूमी तयार झाली आहे. त्यामध्ये ढगाळ वातावरण आणि हवेच्या वेगाची दिशा यामुळे मान्सूनला पूरक वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येतंय.
प्री-मान्सून शॉवर ज्याला आपल्याकडे आंबेसरी म्हणतात, त्या गेल्या तीन दिवसांपासून केरळमध्ये बरसत आहेत. त्यातच मान्सूनच्या आगमनाची चाहुल लागल्याने आंबेसरी आणि मान्सूनमध्ये विभागणी करणं अवघड झालं आहे. या दोन्ही सरी आता एकमेकावर ओव्हरलॅप होण्याची शक्यता दाट आहे. नेहमी केरळच्या भूमीवर 1 जून रोजी मान्सूनचं आगमन होत असतं, यावेळी ते 30 मे रोजीच होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याचं हे वातावरण लक्षात घेता पहिल्या दहा दिवसात दक्षिण भाग आणि पश्चिम किनापट्टी मान्सूनने व्यापला जाणार याची पूर्ण खात्री आहे. त्याच पद्धतीने उत्तर आणि ईशान्य भारतात मान्सूनचा प्रवास वेळेआधीच होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :