Corona Vaccine : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत काँग्रेसनं मोदी सरकारविरोधात आंदोलन केलं. लस तुटवड्याच्या मुद्द्यावरुन हे आंदोलन पुकारण्यात आलं. काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपर येथे पंतप्रधान मोदींवर टीका करणारे फलक लावण्यात आले होते. त्यामध्ये आमच्या मुलांच्या वाट्याच्या लसी परदेशात का पाठवल्या? असा सवाल मोदींना करण्यात आला होता. त्याच धर्तीवर आता काँग्रेस कार्यकर्ते केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरले. 


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीसुद्धा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मोदींना लक्ष केलं होतं. लसीकरणाच्या नियोजनावरुन त्यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढत कोरोनाचं गांभीर्य सरकारला समजलंच नसल्याची शोकांतिका त्यांनी मांडली आणि त्याच मुद्द्यावरुन आता मुंबई काँग्रेसच्या वतीनं आक्रमक भूमिका घेत आंदोलन पुकारण्यात आलं. 


'हमारे बच्चों की वॅक्सिन विदेश क्यू भेजी गई?', असं लिहिलेले बॅनर यावेळी आंदोलकांनी सोबत आणत केंद्राविरोधात आवाज उठवला.  मुंबईतील कॅडबरी जंक्शन इथे आंदोलकांनी उपस्थिती लावली असून, बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळालं. 


सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी वॉक इन लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. इतर वारांना नोंदणी करुनच लसीकरणाची सुविधा मिळवता येत आहे. असं असतानाच केंद्राकडून 18 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली होती. पण, लसींच्या पुरवठ्याअभावी या लसीकरणास ब्रेक लागला. केंद्राकडून न होणाऱ्या या पुरवठ्याबाबत काँग्रेसनं असंतोष व्यक्त करत आंदोलनाचं पाऊल उचललं. 



Corona Update : कोरोनाची रुग्णसंख्या कमी होतेय, गेल्या 24 तासात 1.73 लाख नव्या रुग्णांची भर तर 3617 रुग्णांचा मृत्यू


महाराष्ट्रात लसीकरण मोफत झालं पाहिजे, अशी मागणी करत आपण लिहिलेल्या पत्राला विचारात घेत  मुख्यमंत्र्यांनी मोफत लसीकरणास मान्यता दिल्याबद्दल भाई जगताप यांनी त्यांचे आभार मानले. सोबतच मुंबईतमागील चार दिवसांपासून सुरु असणाऱ्या या आंदोलनात महिलांचाही सहभाग आहे ही बाब गंभीर असून, त्यांनाही आपल्या मुलाबाळांना लस केव्हा मिळणार हाच प्रश्न सतावत असल्याचं ते म्हणाले.  


सीरम इन्स्टीट्युटचे सीईओ आदर पुनावाला यांनी स्पष्टीकरण देत ज्या देशांत कोरोनाची स्थिती गंभीर आहे त्यांच्याशी करारबद्ध असल्यामुळं तिथं लस पाठवणं गरजेचं असल्याचं म्हटलेलं, पण कोणीही पुनावाला यांचं प्रतिनिधीत्त्वं करु नये असं भाई जगताप यांनी ठाम शब्दांत सांगितलं. आपला करार काही देशांसोबत झाला आहे, 93 देशांसोबत नाही, त्यामुळे आदर पुनावाला यांना आपलं इतकंच सांगणं आहे की तुम्ही लस बनवा राजकारणात पडू नका, असा इशाराच त्यांनी दिला. 
 
काँग्रेसच्या आंदोलनाचा भाजपचा विरोध 


भाजप नेते अतुल भातखळकर यांनी भाजपच्या वतीनं काँग्रेसच्या या आंदोलनाला विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली. लॉकडाऊन सुरु असताना राज्यातील सत्ताधारी पक्षापैकी एक असणाऱ्या काँग्रेसचे नेते आंदोलन करतातच कसे?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लॉकडाऊनच्या नियमांवरुन महाविकासआघाडीवर त्यांनी निशाणा साधला. शिवाय भाई जगताप यांच्यावर लॉकडाऊन नियमांच्या उल्लंघनासाठी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 


शिवाय लसींच्या तुटवड्याबाबतच्या आरोपांबद्दल भाई जगताप यांचं मत अतिशय उथळ असल्याचं ते म्हणाले. भाजपकडून या आंदोलनाचा निषेध असल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली. ग्लोबल टेंडरच्या नावाखाली जनतेची फसवणूक करण्यापेक्षा 18 ते 44 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरु करा अशी मागणी त्यांनी केली.