नागपूर : पोलिसांना आमचे खरंच पुनर्वसन करायचे आहे तर आधी आमचे लग्न सरकारी नोकरी आणि स्वतःचं घर असलेल्यांसोबत लावून द्यावे. आम्ही देहविक्रीचा व्यवसाय बंद करू. आमची देहविक्री (Sex Workers) करणारी वस्ती बंद पाहिजे तर आधी पन्नास सरकारी नोकरदार आमच्यासोबत लग्न करण्यासाठी आणा. नागपूरच्या गंगा जमुना वस्तीतील वारंगनानी पोलिसांसमोर हे नवे आणि अफलातून प्रस्ताव ठेवले आहे. एवढेच नाही आज गंगा जमुना (Ganga Jamuna) वस्तीत चालणाऱ्या देहविक्रीच्या विरोधात आंदोलन करणारे अनेक पुरुष काही वर्षांपूर्वीपर्यंत आमच्याकडे शैय्यासोबत करायला येत होते असा गौप्यस्फोटही वारंगनांनी केला आहे. वारंगनांनी सुरु केलेल्या या आंदोलनात आता अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह थेट नागपूरचे राजे मानल्या जाणाऱ्या मुधोजी राजे यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांसमोरचे आव्हान वाढत चालले आहे. 


नागपूरच्या गंगा जमून वस्तीत देहविक्रीच्या व्यवसायात असलेल्या सर्व महिला धाडसाने आपलं म्हणणंच मांडत नाहीये. तर अनेकांचे खोटे बुरखेही फाडत आहेत. त्यांचा दावा आहे की आज त्यांच्या वस्तीत देहविक्रीचा व्यवसाय चालतो, तिथे अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यवसाय करून घेतला जातो. असे मुद्दे पुढे करत जे लोकं गंगा जमुना वस्ती बंद करण्याची मागणी करत आहेत. त्यापैकी अनेकजण कधी काळी आमच्या वस्तीत शैय्यासोबत करायला यायचे. मात्र, आज त्यांचे उद्दिष्ट बदलल्याने तेच आमच्या विरोधात आवाज बुलंद करत आहेत.


लग्न लावण्यासाठी सरकारी नोकरी असलेले 50 पुरुष आणा..
एवढंच नाही तर गंगा जमुना वस्ती सील करून तिथला देहविक्रीचा व्यवसाय बंद पाडणाऱ्या आणि वारांगनांच्या पुनर्वसनासाठी नवनवीन प्रस्ताव देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसमोरही या महिलांनी खळबळजनक मागणी केली आहे. वारांगणांचं म्हणणं आहे. पोलिसांच्या पुनर्वसन योजनेत आम्ही सहभागी होऊ. मात्र, त्यासाठी पोलिसांनी आधी आमचे लग्न सरकारी नोकरी आणि स्वतःचं घर असलेल्या पुरुषांसोबत लावून द्यावे. आज वस्तीत 30 ते 40 वयोगटातील किमान 50 महिला पुनर्वसित होण्यासाठी तयार आहेत. त्यांच्यासोबत लग्न लावण्यासाठी सरकारी नोकरी असलेले 50 पुरुष आणा अशी मागणी या महिलांनी केली आहे. 


10 ऑगस्ट रोजी नागपूर पोलिसांनी गंगा जमुना वस्तीत छापे घालून 23 महिला आणि अनेक अल्पवयीन मुलींना देह व्यापार करताना पकडले होते. अल्पवयीन मुलींना तर ठिकाणी छोट्या कोंडवाड्या सारख्या खोलीत अमानवीय स्थितीत ठेवले जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत उघड झाले होते. त्यानंतर पोलिसांनी इथले अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 च्या अनुषंगाने गंगा जमुनामध्ये चालवले जाणारे देह व्यापार एक वर्षांसाठी बंद करण्याची नोटीस देत (सर्व घरांच्या भिंतीवर चिटकवले) संपूर्ण वस्ती चारही बाजूने बेरिकेडिंग करत बंद केली होती. त्यानंतर वारंगनांनी विदर्भ अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात आपले आंदोलन सुरु करत पोलिसांची कारवाई आमच्यावर अन्याय असल्याचे म्हंटले होते. आता हळूहळू वारांगनांच्या आंदोलनाला अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळू लागला आहे. पोलिसांची कारवाई काही धनदांडगे आणि बिल्डर लॉबीच्या मदतीसाठी असल्याचे आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका अरुणा सबाणे यांनी केले आहे.
 
तर नागपूरचे संस्थानिक आणि भोसले राजघरांण्याचे वर्तमान वंशज मुधोजी राजे भोसले यांनी ही वारांगनांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या महिलांना दिलेल्या जागेवर स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण करत चारही बाजूला वस्ती उभारली. आज त्यांना त्रास होत असल्याचा मुद्दा जरी ते पुढे करत असले तरी या महिला 200 वर्षांपासून तिथे आल्याचे मत व्यक्त केले आहे.


जमीन बिल्डर व इतर धनदांडग्यांच्या घशात टाकण्याचा डाव..
पोलिसांची कारवाई जागा खाली करून अनेक एकर जमीन बिल्डर व इतर धनदांडग्यांच्या घशात टाकण्यासाठी असल्याचे आरोप करत नागपूरचे लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्रीही या मुद्द्यावर अर्थपूर्ण मौन साधून आहेत असा आरोप ज्वाला धोटे यांनी केला आहे. दरम्यान, एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला तरी पोलिसांनी गंगा जमुना वस्तीतील प्रत्येक गल्ली बोळावर लावलेले बेरिकेडिंग हटवले नाही. आमचं उद्दिष्ट तिथून देहविक्री करणाऱ्या महिलांना हटवायचं नसून त्या ठिकाणी चालणारा देहविक्रीचा व्यवसाय आणि त्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार थांबवण्याचा आहे. आणि त्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना थांबवण्यासाठी बेरिकेडिंग करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.