नागपूर : त्या दिवशी शिक्षकांनी मारले नसते तर मी कधीच भाषण द्यायला शिकलो नसतो, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज शिक्षक दिनी आपल्या शिक्षकांनी दिलेल्या त्या शिक्षेची आठवण काढत शिक्षकांचे आभार मानले. शाळेत भाषण देताना अडखळणाऱ्या सहविद्यार्थिनीची खिल्ली उडवणाऱ्या गडकरींना त्यांच्या मुख्याध्यापकाने पाहिले त्यानंतर गडकरींची कान उघाडणी करत मारले होते. आज नागपूरच्या ऊथ पब्लिक शाळेच्या "फाउंडर्स डे" या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. 


शाळेत भाषण देताना अडखळणाऱ्या सहविद्यार्थिनीची खिल्ली उडवणाऱ्या गडकरींना त्यांच्या मुख्याध्यापकाने पाहिले होते. त्यानंतर त्यांनी गडकरींची कान उघाडणी करत त्यांना मारले होते. ती किमान अडखळत तरी भाषण देत आहे. तुझ्यात तर तेवढीही हिम्मत नाही. शिक्षकाचे तेच शब्द गडकरींना प्रेरणा देणारे ठरले. आणि रागापायीच का होईना त्यांच्यात भाषण देण्याची इच्छा जागृत झाल्याचे गडकरी म्हणाले. शिक्षकांनी त्या दिवशी बदडले नसते तर आज उत्तम भाषण देऊ शकलो नसतो. आज मराठीसह हिंदी आणि इंग्रजीत भाषण देऊ लागलो असून भाषणांच्या व्हिडीओद्वारे युट्युबवरून लाखो रुपये कमावतो आहे असेही गडकरी म्हणाले. 


राज्यातील दोन शिक्षकांचा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान; नारायण चंद्रकांत मंगलाराम आणि संगीता सोमाणी यांचा गौरव


भारतीय शिक्षण पद्धती सर्वात मोठी शक्ती असून मूल्याधिष्ठित शिक्षण, अबाधित कुटुंब संस्था आणि कौटुंबिक संस्कार हे त्याचे स्तंभ आहेत. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे कुठल्या शाळेत गेले नव्हते, शिवाजी महाराजांकडे कोणतीही पीएचडी नव्हती, तरी ते आपल्यासाठी आदर्श आहेत. त्यामुळे शिक्षित असणे आणि सुशिक्षित असणे यात फरक असल्याचे गडकरी म्हणाले. जगात कोणीही परिपूर्ण नाही, माणूस असेल तर त्याच्यात अवगुण असतीलच. मात्र, शिक्षकांच्या सानिध्यात आपले दोष गुणांमध्ये परिवर्तित करणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे. चांगले डॉक्टर, चांगले इंजिनीअर बनणे आवश्‍यक आहे. मात्र, त्यापूर्वी चांगला माणूस बनणे महत्वाचे असून त्यासाठी देशात चांगल्या शिक्षण संस्था असणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. 


कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शिक्षकांच्या समक्ष गडकरी चांगले रमले होते. त्यांनी त्यांच्या शालेय जीवनापासून तर क्रीडांगणापर्यंतचे अनेक किस्से सांगितले. सचिन तेंडुलकर कमी उंचीचा असून ही परदेशातील उंच पुऱ्या गोलंदाजाना नामोहरम करायचा. ते करण्यासाठी त्याने शारीरिक शक्तीचे नव्हे तर कौशल्याचे वापर केल्याचे गडकरी म्हणाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून विविध क्षेत्रातले कौशल्य आत्मसात करावे असे गडकरी म्हणाले.