Nagpur Online Fraud : नागपुरात ऑनलाईन गेमच्या (Online Game) माध्यमातून एका व्यापाऱ्याची तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आरोप हा गोंदियातील (Gondia) आहे. अनंत जैन असं आरोपीचं नाव असून तो फरार झाला. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी अनंत जैनच्या गोंदियातील घरी छापा घातल्यानंतर कोट्यवधींची रोख रक्कम जप्त केली आहे. अनंत जैनच्या घरातून आतापर्यंत जवळपास 18 कोटी रुपयांची रोख रक्कम, 15 किलो सोनं आणि 20 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. आरोपी हा क्रिकेट सट्टेबाज आहे. नागपूरच्या (Nagpur) इतिहासातील ऑनलाईन फसवणुकीची ही सर्वात मोठी घटना आहे.
आरोपी आणि फिर्यादी परिचित होते
नोव्हेंबर 2021 पासून ही फसवणूक सुरु होती. तक्रारदार व्यापारी व्यवसायाच्या निमित्त आरोपीच्या संपर्कात आला होता. त्यामुळे दोघांचा परिचय होता. आरोपीने ऑनलाईन गेमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा असल्याची बतावणी केली. आरोपीने फिर्यादीला एक लिंक पाठवून त्यावर रम्मी, कॅसिनो आणि तीनपत्ती या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवले दाखवले. आधी व्यापाऱ्याने त्यास नकार दिला. मात्र, आरोपीने जास्तच आग्रह केल्याने व्यापारी तयार झाला. आरोपीने व्यापाऱ्याला 'डायमंड एक्सचेंज डॉट कॉम' या लिंक पाठवून त्याचं लॉगिन आणि पासवर्ड तयार करुन ऑनलाईन बेटिंग सुरु केले.
कशी झाली फसवणूक?
सुरुवातीला बँक खात्यात आठ लाख रुपये जमा झाल्याचे व्यापाऱ्याला दिसलं. त्यानंतर व्यापारी जुगार खेळायला लागला. सुरुवातीला व्यापारी जिंकला. त्यानंतर तब्बल 58 कोटी रुपये हरला. अनंत हा सतत जिंकत असल्याने व्यापाऱ्याला संशय आला. त्याने त्याला पैसे परत मागितले. मात्र अनंतने पैसे देण्यास नकार दिला. याशिवाय त्याला कुठे वाच्यता केल्यास अपहरण करुन मारण्याचीही धमकी दिली. त्यातून त्याने उर्वरित चाळीस लाख रुपयेही अनंतला दिले. यानंतर व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
आरोपीच्या घरावर छापा, 18 कोटी रुपयांची रोकड, 15 किलो सोनं सापडलं
यानंतर नागपूर गुन्हे शाखा आणि गोंदिया गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या गोदिंयातील घरी धाड टाकली असता, त्याच्याकडून जवळपास 18 कोटी रोख, 15 किलो सोने आणि 20 किलो चांदी जप्त करण्यात आली. आरोपी अनंत जैन हा गोंदियातील क्रिकेट सट्टेबाज असल्याचं समोर आलं आहे. या ऑनलाईन फसवणुकीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
VIDEO : Nagpur Online Game Fraud : नागपूरमध्ये ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून 58 कोटींची फसवणूक
हेही वाचा